राज्याच्या आरोग्य विभागात इतक्या हजार डॉक्टरांची भरती... मंत्री प्रकाश आबिटकर यांची घोषणा...

Share:
Main Image
Last updated: 18-Aug-2026

अक्षय काळे, (मुंबई) १८ ऑगस्ट - राज्यातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी महायुती सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांत १,४४० नवीन डॉक्टरांची नियुक्ती केली जाणार असून आणखी ६०० डॉक्टरांच्या भरतीसाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. याशिवाय सुमारे २५० दंतचिकित्सकही (Dentists) लवकरच शासकीय आरोग्य सेवेत दाखल होणार आहेत.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध समित्यांच्या सदस्यांशी आयोजित ऑनलाइन ‘जन आरोग्य संवादा’दरम्यान आरोग्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. या उपक्रमाद्वारे आतापर्यंत ६ लाखांहून अधिक नागरिकांशी संवाद साधण्यात आला असून, आगामी काळात आणखी ४ लाख नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांच्या आरोग्यविषयक तक्रारी जाणून घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

आरोग्यमंत्र्यांच्या महत्त्वाच्या घोषणा व निर्णय:

तक्रारींसाठी डिजिटल पोर्टल: नागरिकांना आरोग्य सेवांसंदर्भातील तक्रारी आणि अडचणी थेट प्रशासनापर्यंत सहज पोहोचवता याव्यात, यासाठी लवकरच एक स्वतंत्र ऑनलाइन तक्रार निवारण पोर्टल सुरू केले जाईल.

Advertisement

बचत गटांमार्फत रुग्णांना पोषक आहार: शासकीय रुग्णालयांतील रुग्णांना दर्जेदार आणि सकस आहार मिळण्यासाठी स्थानिक महिला बचत गटांची मदत घेतली जाईल.

प्रत्यक्ष कामावर भर: डॉक्टर वेळेवर उपस्थित राहतात का, रुग्णालयात आवश्यक सेवा उपलब्ध आहेत का, याचा थेट आढावा घेतला जात असून आरोग्य व्यवस्था ही केवळ कागदावर नव्हे तर प्रत्यक्षात दिसली पाहिजे, यावर आरोग्यमंत्र्यांनी भर दिला.

निधीची कमतरता भासणार नाही: 'निरोगी महाराष्ट्र-सुदृढ महाराष्ट्र' हे स्वप्न साकार करण्यासाठी राज्याच्या आरोग्य यंत्रणेला आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

या बैठकीत माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शासकीय दवाखान्यांत अनुपस्थित राहणाऱ्या डॉक्टरांवर लक्ष ठेवण्यासाठी आठवड्यातून एक दिवस निश्चित करण्याची सूचना केली, ज्याला आरोग्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या ऑनलाईन संवादास राज्यमंत्री आशिष जयस्वाल, विविध आमदार, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक आणि राज्यातील सर्व जिल्हा शल्यचिकित्सक उपस्थित होते.

Comments

No comments yet.