अक्षय काळे, (मुंबई) १८ ऑगस्ट - मुंबई मेट्रो लाइन ९ च्या बांधकामादरम्यान सुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे. मीरा-भायंदर परिसरातील मेडेतिया नगर स्टेशनजवळ उंचावरून ग्रॅनाइटचे दगड खाली पडल्याची घटना घडली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या प्रकरणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) कडक भूमिका घेत जबाबदार कंत्राटदार आणि सल्लागार कंपन्यांवर १२.५ कोटी रुपयांचा दंडात्मक बडगा उचलला आहे.
असा घडला अपघात
सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास मेडेतिया नगर स्टेशनजवळ क्रेनच्या साहाय्याने बांधकाम साहित्य आणि कचरा बाजूला करण्याचे काम सुरू होते. यादरम्यान साहित्याची टोपली (Material Basket) जवळच फूटओव्हर ब्रिजवर (FOB) रचून ठेवलेल्या ग्रॅनाइटच्या दगडांना धडकली. या धडकेमुळे उंचावरून ग्रॅनाइटचे दगड खाली बॅरिकेड केलेल्या कामाच्या जागेत पडले.
याच वेळी जवळून जाणाऱ्या एका शालेय बसचे चाक खाली विखुरलेल्या दगडांच्या तुकड्यांवरून गेल्याने बसचे चाक पंक्चर झाले. सुदैवाने, या बसमध्ये विद्यार्थी नव्हते आणि कोणताही दगड थेट वाहनावर पडला नाही, असे स्पष्टीकरण प्रशासनाने दिले आहे.
दंडात्मक कारवाईचा तपशील
सुरक्षेतील हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा देत MMRDA ने खालीलप्रमाणे दंडात्मक कारवाई केली आहे:
जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स लि. (JKIL): मुख्य कंत्राटदार – ₹१० कोटी
एन. ए. गजानन (N.A. Gajanan): आर्किटेक्चरल फिनिशिंग कंत्राटदार – ₹१.५ कोटी
सिस्ट्रा-सीईजी (Systra-CEG): जनरल कन्सल्टंट – ₹१ कोटी
सुरक्षेबाबत तडजोड नाही: MMRDA
प्रकल्पाच्या ठिकाणी सुरक्षेच्या नियमांचे पालन करणे अत्यंत अनिवार्य आहे. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सुरक्षा प्रोटोकॉलचे कठोरपणे पालन करावे आणि आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना तत्काळ लागू कराव्यात, असे निर्देश MMRDA द्वारे देण्यात आले आहेत.