जळगाव, (प्रतिनिधी) १८ ऑगस्ट - दिव्यांग वकिलाच्या नवीन कारचे आरटीओ कार्यालयातून कायमस्वरूपी पासिंग करून देण्यासाठी तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नावे ७ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या खासगी एजंटाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सोमवारी (दि. १७) रंगेहात पकडले. योगेश रामभाऊ पाटील (वय ३९, रा. आदर्शनगर, जुन्या आरटीओ शेजारी, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या खासगी एजंटाचे नाव आहे.
नेमके प्रकरण काय?
जळगाव येथील ४१ वर्षीय दिव्यांग खाजगी वकिलाने १ जुलै २०२६ रोजी खान्देश मोटर्स शोरूममधून मारुती अल्टो के-१० कार खरेदी केली होती. या कारची ३ ऑगस्ट रोजी शोरूमचा खासगी एजंट योगेश पाटील याच्यामार्फत आरटीओ कार्यालयात तात्पुरती नोंदणी (CRTM) करण्यात आली होती. त्यानंतर तक्रारदार दिव्यांग असल्याने त्यांनी कारमध्ये ‘हँडकिट’ बसवून घेतली.
१२ ऑगस्ट रोजी तक्रारदार कारच्या कायमस्वरूपी पासिंगच्या चौकशीसाठी आरटीओ कार्यालयात गेले असता तेथे त्यांना खाजगी एजंट योगेश पाटील भेटला. त्याने आरटीओ कार्यालयातील अधिकारी व संबंधित टेबलच्या कर्मचाऱ्यांकडून पासिंगचे काम करून देण्याच्या मोबदल्यात ‘साहेबांच्या व कर्मचाऱ्यांच्या नावे’ तक्रारदाराकडे प्रथम १० हजार रुपयांची मागणी केली; तडजोडीअंती ती रक्कम ८ हजार ५०० रुपये ठरली.
तडजोडीत ७ हजार लाच ठरली, शोरूमजवळ सापळा
तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी दि. १७ ऑगस्ट रोजी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. एसीबीच्या पथकाने आरटीओ कार्यालयाच्या पटांगणात पंचांसमक्ष पडताळणी केली असता, योगेश पाटील याने ८ हजार ५०० रुपयांवरून तडजोडीअंती ७ हजार रुपये स्वीकारण्यास सहमती दर्शविली.
त्यानंतर पथकाने दुपारी इच्छादेवी चौकातील बजाज टीव्हीएस शोरूम परिसरात सापळा रचला. तक्रारदाराकडून ७ हजार रुपयांची लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्वतः स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने आरोपी योगेश पाटील याला रंगेहात ताब्यात घेतले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
तपास पथक
ही धडक कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे, कविता फडतरे आणि जळगावचे पोलीस उप अधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, श्रेणी पोउपनिरी. सुरेश पाटील, पोहवा. सुनील वानखेडे व पोकॉ. राकेश दुसाने यांच्या पथकाने केली.