साक्री, (प्रतिनिधी) १८ ऑगस्ट - शबरी आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलाच्या अनुदानाचा पुढील हप्ता जमा करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना साक्री पंचायत समितीचा ग्रामीण गृहनिर्माण अभियंता मनमोहन विजयसिंग राजपूत (वय ३०) आणि शासकीय ठेकेदार रोहन रोहिदास देवरे (वय ३१) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी रंगेहात पकडले. या कारवाईमुळे पंचायत समिती वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमके प्रकरण काय?
तक्रारदार (वय ५४) व त्यांच्या नातेवाईकांना मौजे जामदे येथे साक्री पंचायत समितीमार्फत शबरी आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले होते. अनुदानाचा पहिला हप्ता मिळाल्यानंतर तक्रारदारांनी बांधकामाला सुरुवात केली होती. यापूर्वी अनुदानाचे हप्ते खात्यावर जमा करण्यासाठी अभियंता मनमोहन राजपूत याने प्रत्येक लाभार्थ्याकडून ५ हजार याप्रमाणे २५ हजार रुपये उकळले होते.
यानंतर तक्रारदार यांनी १३ ऑगस्ट रोजी उर्वरित अनुदानाच्या हप्त्याची चौकशी करण्यासाठी साक्री पंचायत समिती कार्यालय गाठले असता, अभियंता राजपूत याने कामासाठी पुन्हा २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याप्रकरणी तक्रारदारांनी १७ ऑगस्ट रोजी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
शेवाळी फाट्यावर रचला सापळा
तक्रारीची पंचांसमक्ष पडताळणी केली असता, राजपूत याने उर्वरित अनुदान अदा करण्यासाठी २० हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार मंगळवारी (दि. १८) साक्री-धुळे रस्त्यावरील शेवाळी फाट्याजवळ एसीबीने सापळा रचला. अभियंता राजपूत याच्या सांगण्यावरून शासकीय ठेकेदार रोहन देवरे याने तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने दोघांना रंगेहात ताब्यात घेतले. याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
कारवाई पथक ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे, कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे एसीबीचे उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल, यशवंत बोरसे, पोलीस अंमलदार राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रितेश चौधरी आणि सुधीर मोरे यांच्या पथकाने केली.