नवी दिल्ली, (प्रतिनिधी) १६ ऑगस्ट - केंद्र सरकारच्या अमली पदार्थांविरोधातील 'झिरो टॉलरन्स' धोरणाला मोठे यश मिळाले आहे. नार्कोटिक्स CONTROL ब्युरोने (NCB) 'ऑपरेशन ग्लोबल-हंट' अंतर्गंत कारवाई करत आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया आणि फरार आरोपी वीरेंद्र सिंह बसोया याला संयुक्त अरब अमिरातीमधून (UAE) भारतात यशस्वीरीत्या परत आणले आहे. नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच एनसीबीने त्याला ताब्यात घेतले.
गृहमंत्री अमित शाह यांनी या यशाचे कौतुक करत स्पष्ट केले की, "मोदी सरकारच्या काळात अमली पदार्थांचे तस्कर जगाच्या पाठीवर कुठेही लपले, तरी ते भारतीय कायद्याच्या पकडीतून सुटू शकत नाहीत."
तपासातील महत्त्वाचे मुद्दे व पार्श्वभूमी:
पुणे अन् दिल्लीतील ड्रग्ज रॅकेट: फेब्रुवारी २०२४ मध्ये पुणे शहरात ५०० ग्रॅम मेफेड्रोन सापडल्यानंतर सुरू झालेल्या तपासाचा धागा थेट बसोयापर्यंत पोहोचला. तपासादरम्यान पुण्यातून ८६७ किलो आणि दिल्लीतून ९७० किलो असे एकूण सुमारे १,८३७ किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते.
प्रमुख सूत्रधार: बसोया हा भारतात तयार होणारे मेफेड्रोन परदेशात पाठवणारा आणि आंतरराष्ट्रीय नेटवर्क चालवणारा मुख्य सूत्रधार आहे. ऑक्टोबर २०२४ मधील दिल्ली पोलिसांच्या कारवाईत सापडलेल्या १,३०० किलोपेक्षा जास्त कोकेन आणि हायड्रोपोनिक गांजा प्रकरणातही त्याचा सहभाग आढळला होता.
'ऑपरेशन ग्लोबल-हंट'ची यशोगाथा: एनसीबीच्या विनंतीवरून इंटरपोलने जारी केलेल्या 'रेड नोटीस'नंतर बसोयाला जून २०२६ मध्ये युएईमध्ये अटक झाली होती. याआधी याच मोहिमेअंतर्गत मोहम्मद सलीम डोला (तुर्की) आणि नवीन चिचकर (मलेशिया) या तस्करांनाही भारतात आणण्यात आले आहे.