अक्षय काळे, (मुंबई) १६ ऑगस्ट - मराठवाडा आणि लगतच्या परिसरातील संपर्क व्यवस्था (Connectivity) अधिक बळकट करण्यासाठी भारतीय रेल्वेने अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची अंमलबजावणी सुरू केली आहे. दौंड-मनमाड मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाले असून अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ नवीन लोहमार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. याशिवाय, मराठवाड्यातील प्रमुख शहरांना जोडणाऱ्या चार नवीन रेल्वे मार्गांच्या सर्वेक्षणाला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
पूर्ण आणि प्रगतीपथावर असलेले मोठे प्रकल्प:
१. दौंड-मनमाड दुहेरीकरण (२३६ किमी)
प्रकल्प खर्च: ₹३,४२६ कोटी
सद्यस्थिती: या प्रकल्पाचे नुकतेच लोकार्पण झाले असून यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतुकीची क्षमता आणि वेग लक्षणीयरीत्या वाढला आहे.
२. अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ नवीन मार्ग (२६१ किमी)
प्रकल्प खर्च: ₹५,८०० कोटी
सद्यस्थिती: यातील अहिल्यानगर ते बडवाणी (२०१ किमी) मार्गाचे काम पूर्ण होऊन लोकार्पण झाले आहे. उर्वरित मार्गासाठी आवश्यक असलेल्या ३७१ हेक्टरपैकी ३६६ हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे. २० पैकी १९ मोठे पूल आणि २३ पैकी ११ उड्डाणपुल (ROB) पूर्ण झाले आहेत.
४ नवीन रेल्वे मार्गांच्या सर्वेक्षणाला (Location Survey) मंजुरी:
मराठवाडा आणि आसपासच्या प्रदेशांना थेट जोडण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पुढील नवीन मार्गांच्या 'अंतिम स्थान निश्चिती सर्वेक्षणाला' (Final Location Survey) मंजुरी दिली आहे:
जालना – खामगाव नवीन मार्ग (१६२ किमी): सर्वेक्षण पूर्ण झाले असून सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यात आला आहे.
पुणे – अहिल्यानगर नवीन मार्ग (१३४ किमी): सर्वेक्षण पूर्ण झाले असून सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार आहे.
धाराशिव – बीड – छत्रपती संभाजीनगर नवीन मार्ग (२४० किमी): सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी अंतिम स्थान सर्वेक्षणाला मंजुरी दिली आहे. हा प्रस्तावित मार्ग गेवराई मधून जाणार आहे.
छत्रपती संभाजीनगर – अहिल्यानगर नवीन मार्ग (११० किमी): सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सर्वेक्षणाला मंजुरी मिळाली आहे.
प्रमुख धार्मिक व औद्योगिक शहरांना फायदा
सध्या परंडा (कुर्डुवाडीपासून २१ किमी), भूम (बार्शीपासून ३७ किमी), मांजरसुंबा (बीडपासून २० किमी) आणि गेवराई (बीडपासून ३१ किमी) ही ठिकाणे जवळच्या रेल्वे स्थानकांशी जोडलेली आहेत. नवीन प्रस्तावित मार्गांमुळे पंढरपूर, कुर्डुवाडी, छत्रपती संभाजीनगर, शेगाव, अहिल्यानगर आणि मनमाड ही प्रमुख शहरे व धार्मिक स्थळे एकमेकांशी अधिक वेगाने जोडली जातील.
प्रकल्पांना मंजुरीची पुढील प्रक्रिया
सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार झाल्यानंतर राज्य सरकार तसेच इतर भागधारकांशी चर्चा केली जाते. त्यानंतर या प्रकल्पांना अंतिम मंजुरी मिळण्यासाठी नीती आयोग आणि अर्थ मंत्रालयाकडून मूल्यमापन व मान्यता मिळणे आवश्यक असते. त्यामुळे प्रत्येक प्रकल्पाची कालमर्यादा या आवश्यक मंजुऱ्यांवर अवलंबून असेल, असे रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले.