अक्षय काळे, (मुंबई) १५ ऑगस्ट - राष्ट्रीय होमिओपॅथी आयोगाने (एनसीएच) होमिओपॅथी डॉक्टरांनी इतर औषधोपचार पद्धतींचा वापर करण्याबाबतची आपली नियामक भूमिका अधिकृत पत्रकाद्वारे स्पष्ट केली आहे. नियमावलीचा चुकीचा अर्थ लावला जाऊ नये आणि संबंधित तरतुदी योग्य संदर्भात समजून घेतल्या जाव्यात, या उद्देशाने हे स्पष्टीकरण जारी करण्यात आले आहे.
एनसीएचच्या व्यावसायिक वागणूक नियमावली २०२२ मधील कलम ३६(वाय) नुसार, होमिओपॅथी डॉक्टरांनी सामान्यतः होमिओपॅथीव्यतिरिक्त इतर कोणत्याही वैद्यकीय पद्धतीचा (अॅलोपॅथी किंवा इतर) सराव करू नये. मात्र, या नियमात एक महत्त्वाची सवलत देण्यात आली आहे.
केन्द्रीय किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत अथवा विशेष उपक्रमांतर्गत इतर औषधोपचार पद्धतींचा वापर करण्यास होमिओपॅथी डॉक्टरांना मनाई नाही. यासाठी संबंधित डॉक्टरने सक्षम प्राधिकरणाने मान्यता दिलेला विहित अभ्यासक्रम किंवा आवश्यक प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेले असणे अनिवार्य आहे.
याशिवाय, एनसीएचच्या पदवी अभ्यासक्रम (बीएचएमएस) नियमन २०२२ मधील कलम १४ (७) कडे आयोगाने लक्ष वेधले आहे. हे उपकलम सरकारी आरोग्य सुविधा आणि राष्ट्रीय आरोग्य मोहिमांमध्ये होमिओपॅथी पदवीधरांच्या सहभागाला व भूमिकेला स्पष्ट मान्यता देते.
सरकारी योजना व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांमध्ये होमिओपॅथी डॉक्टरांचे योगदान सुरक्षित राहावे आणि नियमांचा स्पष्ट अर्थ सर्वांपर्यंत पोहोचावा, यासाठीच आयोगाने ही भूमिका स्पष्ट केली आहे.