एस.के. खेडकर, (नाशिक) १५ ऑगस्ट - भारताच्या सर्वोच्च शासकीय आणि पारंपरिक सोहळ्यांपैकी एक असलेल्या राष्ट्रपती भवनातील ‘ॲट होम’ (At Home) कार्यक्रमाच्या सजावटीचा बहुमान नाशिकचे कलावंत व पत्रकार प्रशांत परदेशी आणि त्यांच्या टीमला मिळाला आहे. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्रात आयोजित या प्रतिष्ठित सोहळ्याची नेत्रदीपक सजावट नाशिकच्या चमूने पूर्ण केली आहे.
राष्ट्रपती भवनातील ‘ॲट होम’ सोहळा हा प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनी राष्ट्रपतींद्वारे आयोजित केला जाणारा अतिशय प्रतिष्ठित स्नेहसंमेलन सोहळा असतो. या सोहळ्यात देश-विदेशातील प्रमुख मुत्सद्दी, पंतप्रधान, पद्म पुरस्कार विजेते, क्रीडापटू, नवसंशोधक आणि विविध २२ राज्यांतील गुणवंत कलावंत सहभागी झाले होते. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी सांस्कृतिक केंद्र सजवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी नाशिकच्या प्रशांत परदेशी यांच्याकडे सोपवण्यात आली होती.
प्रतिकूल हवामानातही कलाकारांची निष्ठा
पत्रकारितेची पारंपरिक वाट सोडून कला क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या प्रशांत परदेशी यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने ही जबाबदारी यशस्वीपणे पेलली. दिल्लीतील बेभरोशाचा पाऊस आणि कडक उन्हाच्या प्रतिकूल वातावरणातही नाशिकच्या या टीमने दिवस-रात्र एक करून सजावटीचे काम पूर्ण केले.
नाशिकच्या टीमचा महत्त्वपूर्ण सहभाग
या राष्ट्रीय मोहिमेत नाशिकचे संगीता मांडोळे, देवकी विभाडिक, फॅशन डिझायनर पूजा विधाते, तसेच डान्स कोरिओग्राफर व सुतारकामातील कुशल कलाकार जतींदर (चिकी) यांनी अत्यंत मोलाचे योगदान दिले.
"सर्वोच्च शासकीय सोहळ्यात सजावटीची संधी मिळणे हा अत्यंत अद्वितीय आनंद आहे. पत्रकारिता सोडताना कुटुंब, मित्रपरिवार, 'आरकेएस' सिंगल सर आणि दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राचे उपसंचालक दीपक कुलकर्णी, निलेश कनेड, आस्था कालेकर-गोडबोले यांच्या पाठबळामुळेच हा ऐतिहासिक योग जुळून आला."
— प्रशांत परदेशी, कलावंत (नाशिक)
स्वातंत्र्यदिनाच्या या भव्य सोहळ्यात नाशिकच्या कलाकारांनी आपल्या कल्पकतेने आणि मेहनतीने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले असून, या यशामुळे नाशिकच्या सांस्कृतिक शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.