सांगली, (प्रतिनिधी) १४ ऑगस्ट - मिरज तालुक्यातील सावळी येथील महिलांसाठी सोमवारचा दिवस अत्यंत अविस्मरणीय आणि प्रेरणादायी ठरला. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) माध्यमातून उभारण्यात आलेल्या 'विजयश्री महिला गृहउद्योग केंद्र' (कॉमन फॅसिलिटी सेंटर) आणि 'नवतेजस्विनी महिला स्वयंरोजगार विक्री केंद्राचे' (व्हेंडर स्टॉल) लोकार्पण सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अत्यंत आपुलकीच्या आणि उत्साही वातावरणात पार पडले.
यावेळी पालकमंत्र्यांनी औपचारिकतेला फाटा देत महिलांशी थेट संवाद साधला, त्यांनी बनवलेल्या उत्पादनांची पाहणी केली आणि महिलांच्या श्रमाला प्रतिष्ठा देत त्यांचा आत्मविश्वास द्विगुणीत केला.
पौष्टिक लाडूंची खरेदी आणि अनौपचारिक संवाद
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गृहउद्योग केंद्रातील यंत्रसामग्री, उत्पादन प्रक्रिया आणि महिलांनी तयार केलेल्या मसाल्यांची, शेवयांची, विविध पिठांची व उन्हाळी वाळवणाची पाहणी केली:
स्वतः खरेदी करून केले वाटप: पालकमंत्र्यांनी स्वयंरोजगार विक्री केंद्रातून महिलांनी बनवलेले पौष्टिक लाडू विकत घेतले आणि तेच लाडू तेथे उपस्थित महिला भगिनींना स्वतःच्या हाताने भरवले.
व्यावहारिक सल्ला: "व्यवसाय करताना कोणालाही वस्तू मोफत देऊ नका. उत्पादनाला योग्य किंमत मिळाली, तरच व्यवसाय वाढेल आणि तुमच्या श्रमाचे मूल्य टिकेल," असा अत्यंत मोलाचा व व्यावहारिक सल्ला त्यांनी महिला उद्योजिकांना दिला.
नारीशक्तीचा जयघोष: केंद्रातून बाहेर पडताना पालकमंत्र्यांनी स्वतः "नारीशक्तीचा विजय असो!" अशी घोषणा दिली, ज्याला महिलांनी उस्फूर्त दाद दिली.
जिल्हा वार्षिक योजनेतून (DPC) ५ कोटींचा निधी
'महिला लखपती' या संकल्पनेला बळ देण्यासाठी सांगली जिल्हा वार्षिक योजनेतील ३ टक्के राखीव निधीतून हा प्रकल्प राबवण्यात आला आहे.
ग्रामीण महिलांसाठी रोजगाराची नवी दिशा
या कॉमन फॅसिलिटी सेंटरमुळे (CFC) आणि पोर्टेबल व्हेंडर स्टॉल्समुळे ग्रामीण भागातील महिलांना अन्नप्रक्रिया, दर्जा सुधारणे, पॅकेजिंग आणि थेट बाजारपेठ मिळवणे एकाच छताखाली शक्य होणार आहे. महिलांनी केवळ बचतगटांच्या बैठकांपुरते मर्यादित न राहता उद्योग उभारून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, यासाठी शासन त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.