अक्षय काळे, (मुंबई) १३ ऑगस्ट - भारतीय स्वातंत्र्याचा ८० वा वर्धापन दिन शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. या संदर्भात राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने अधिकृत परिपत्रक जारी केले असून सर्व विभागीय, जिल्हा, उपविभागीय, तालुका तसेच ग्रामपंचायत मुख्यालयांमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात, तर पुण्यात राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण
मुख्य समारंभ: राज्याचा मुख्य शासकीय स्वातंत्र्यदिन समारंभ मंत्रालयात (मुंबई) आयोजित केला जाणार असून सकाळी ९.०५ वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण पार पडेल.
पुण्यात राज्यपाल: पुणे येथे राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.
इतर सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात ध्वजारोहण समारंभाचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सकाळी ८.३५ ते ९.३५ दरम्यान इतर कार्यक्रमांवर बंदी!
राज्यभरातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये मुख्य शासकीय समारंभाशी वेळ साधत सकाळी ९.०५ वाजता एकाच वेळी ध्वजारोहण होईल. यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना, राष्ट्रीय गीत, राष्ट्रगीत आणि राज्यगीताचे गायन केले जाईल.
वेळेचे कडक नियम:
मुख्य शासकीय कार्यक्रमाचे गांभीर्य राखण्यासाठी सकाळी ८.३५ ते ९.३५ या वेळेत कोणताही इतर शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करता येणार नाही. ज्या संस्था किंवा संघटनांना स्वतःचा ध्वजारोहण कार्यक्रम करायचा असेल, त्यांनी तो सकाळी ८.३५ पूर्वी किंवा सकाळी ९.३५ नंतरच आयोजित करावा, अशा सूचना सामान्य प्रशासन विभागाने दिल्या आहेत.
रोषणाई, वृक्षारोपण आणि विविध स्पर्धांचे आयोजन
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून राज्यातील सर्व सार्वजनिक, शासकीय इमारती आणि ऐतिहासिक किल्ल्यांवर राष्ट्रध्वज फडकवला जाणार आहे. यावेळी ध्वजसंहितेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
याशिवाय शाळा, महाविद्यालये आणि शासकीय स्तरावर वृक्षारोपण, वाद-विवाद स्पर्धा, निबंध, कविता, देशभक्तीपर गीते आणि भाषण स्पर्धांचे आयोजन केले जाईल. याद्वारे राष्ट्रीय एकात्मता, देशाची अखंडता आणि संविधानिक मूल्यांचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवला जाणार आहे.
मान्यवरांना आदरपूर्वक निमंत्रण
या सोहळ्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय, शौर्य पुरस्कार विजेते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांना आदरपूर्वक निमंत्रित करण्यात येणार आहे. सर्व संबंधित यंत्रणांनी स्वातंत्र्यदिन सोहळा अत्यंत यशस्वी आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.