लोककलांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा... सर्व विभागांत...

Share:
Main Image
Last updated: 13-Aug-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १३ ऑगस्ट - महाराष्ट्राची समृद्ध लोककला परंपरा जतन करण्यासाठी आणि कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी येत्या काळात राज्याच्या सर्व विभागांत भव्य स्वरूपात लोककला महोत्सव आयोजित केले जातील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली.

अखिल भारतीय लोककलावंत व मराठी तमाशा परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते ज्येष्ठ तमाशा कलावंत पद्मश्री रघुवीर खेडकर यांचा विशेष नागरी सत्कार करण्यात आला. तसेच लोककलावंतांच्या वतीने मंत्री शेलार यांचाही सन्मान करण्यात आला.

लोककलावंतांच्या प्रमुख मागण्या व निवेदन:

या प्रसंगी तमाशा परिषदेच्या वतीने मंत्री शेलार यांना विविध मागण्यांचे निवेदन सोपवण्यात आले. त्यात खालील बाबींचा समावेश होता:

मरणोत्तर पुरस्कार योजना: शाहिर पठ्ठे बापूराव यांच्या नावाने मरणोत्तर पुरस्कार योजना सुरू करून दिवंगत कलावंतांचा गौरव करावा.

विठाबाई नारायणगावकर स्मारक: लोककलाकार विठाबाई नारायणगावकर यांच्या स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे.

Advertisement

पेन्शन योजना व अभ्यास गट: कलावंतांची पेन्शन योजना आणि इतर कल्याणकारी बाबींसाठी शासकीय समिती गठीत करावी. तसेच ढोलकी फड व संगीतबारीबाबत अभ्यास गटाच्या अहवालानुसार त्वरित शासन निर्णय (GR) काढावा.

तमाशा प्रयोगांना परवानगी: काही जिल्ह्यांत तमाशाच्या प्रयोगांना पोलिसांकडून मिळणाऱ्या परवानगीच्या अडचणी दूर करण्यासाठी गृह विभागाला योग्य सूचना द्याव्यात.

१५ दिवसांत बैठकीचे आश्वासन:

कलावंतांच्या या सर्व मागण्यांवर सकारात्मक विचार करून येत्या १५ दिवसांत विशेष बैठक आयोजित केली जाईल आणि योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मंत्री आशिष शेलार यांनी दिले.

या कार्यक्रमाला लोककला अभ्यासक प्रकाश खांडगे, तमाशा परिषदेचे अध्यक्ष संभाजीराजे जाधव यांच्यासह वसंतराव जगताप, खंडूराज गायकवाड, डॉ. गणेश चंदनशिवे, आविष्कार मुळे, शेषराव गोपाळ, सुनील वाडेकर आणि राज्यभरातून आलेले लोककलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

?s=20

Comments

No comments yet.