अक्षय काळे, (मुंबई) १३ ऑगस्ट - उच्च शिक्षणाच्या विविध योजना, शिक्षणातील पारदर्शकता, करिअर मार्गदर्शन आणि परीक्षा सुरक्षा अशा विविध विषयांवर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मंत्रालयात विद्यापीठ व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी थेट आणि मनमोकळा संवाद साधला. या संवादादरम्यान विद्यार्थ्यांनी धोरणनिर्मिती प्रक्रियेत युवकांचा सहभाग वाढवण्यासाठी तसेच शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक अभ्यासपूर्ण सूचना मांडल्या.
विद्यार्थ्यांनी नवीन शैक्षणिक धोरणे, कायदे आणि निर्णयांवर युवकांची मते जाणून घेण्यासाठी 'ओपिनियन पोल' किंवा शासनाच्या पोर्टलवर सुलभ डिजिटल अभिप्राय यंत्रणा विकसित करण्याची महत्त्वाची सूचना केली.
सामाजिक कार्यासाठी आठवड्यातून १ तास द्या: चंद्रकांत पाटील
विद्यार्थ्यांच्या सर्व सूचनांचे स्वागत करत मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी युवकांना नेतृत्व स्वीकारण्याचे आवाहन केले.
माहितीपुस्तिका व दस्तऐवजीकरण: विद्यार्थ्यांनी डिजिटल युगातील माहितीचा वापर करून महाराष्ट्र सरकारच्या योजना व लाभार्थ्यांची माहिती संकलित करून दस्तऐवज तयार करावा.
सामाजिक बांधिलकी: प्रत्येक विद्यार्थ्याने आठवड्यातून किमान एक तास सामाजिक कार्यासाठी द्यावा. विद्यार्थ्यांनी ठोस सामाजिक उपक्रम हाती घेतल्यास शासन त्यांना पूर्ण सहकार्य व आर्थिक पाठबळ देईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
महिला प्राध्यापकांच्या नेतृत्वाखाली नोडल कमिटी: योजनांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत सहज पोहोचावी यासाठी प्रत्येक महाविद्यालयात महिला प्राध्यापकांच्या नेतृत्वाखाली 'नोडल कमिटी' स्थापन केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
सीईटी परीक्षा सुरक्षेसाठी ७३ हून अधिक सुरक्षा बिंदू
स्पर्धा परीक्षा आणि सीईटी परीक्षांच्या सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नावर अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, राज्य सरकार आणि सीईटी सेलने सुरक्षेसाठी ७३ हून अधिक सुरक्षा बिंदू (Security Points) निश्चित केले आहेत. सायबर यंत्रणांच्या मदतीने मानवी हस्तक्षेप कमी करून परीक्षा अधिक पारदर्शक व सुरक्षित करण्यावर भर दिला जात आहे.
या संवादादरम्यान नशामुक्ती, विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य, रस्ते सुरक्षा, एकल पाल्यांच्या समस्या आणि एनसीसी/एनएसएसमधील सहभाग यांसारख्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.