सुरक्षा रक्षकांच्या नोंदणीसाठी साडेपाच लाखांचा 'रेट'... जिल्हा परिषदेत लाचेचा मोठा ब्लास्ट...

Share:
Main Image
Last updated: 13-Aug-2026

धुळे, (प्रतिनिधी) १३ ऑगस्ट - सुरक्षा रक्षक मंडळाकडे नोंदणी करून शिफारसपत्र पाठवण्याच्या मोबदल्यात ५ लाख ८० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यापैकी ४ लाख ८० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना खाजगी सिक्युरिटी एजन्सीच्या सुपरवायझरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) पारोळा येथे रंगेहात पकडले. याप्रकरणी धुळे जिल्हा परिषदेतील वर्ग-३ चा फिटर आणि खाजगी एजन्सीचा सुपरवायझर अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.  

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, धुळे जिल्हा परिषदेत public works department (सार्वजनिक बांधकाम विभाग) येथे कार्यरत असलेले फिटर पुरुषोत्तम मंगाजी वाघ (वय ५०, रा. देवपूर, धुळे) आणि बाबाजी नगर येथील सिक्युरिटी एजन्सीचा सुपरवायझर बारकू काळू पाटील (वय ६०) अशी आरोपींची नावे आहेत.  

काय आहे प्रकरण?
तक्रारदार हे गेल्या १४ महिन्यांपासून धुळे जिल्हा परिषदेत तात्पुरत्या स्वरूपात खाजगी सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत. शासकीय नियमानुसार, खाजगी सुरक्षा एजन्सीमध्ये ६० दिवस सलग काम केल्यानंतर सुरक्षा रक्षक मंडळात अधिकृत नोंदणी केली जाते. तक्रारदारासह अन्य ४ सुरक्षा रक्षकांचा नोंदणी प्रस्ताव तयार करणे, शासनाची अनामत रक्कम भरून शिफारसपत्र मंडळाकडे पाठवण्यासाठी आरोपी पुरुषोत्तम वाघ आणि बारकू पाटील यांनी प्रति सुरक्षा रक्षक १ लाख ५० हजार याप्रमाणे एक एकूण ७ लाख ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.  

Advertisement

तक्रारदारांनी यापूर्वीच १ लाख रुपये दिले होते, परंतु काम प्रलंबित राहिल्याने त्यांनी ८ ऑगस्ट रोजी कामाबाबत विचारणा केली असता उर्वरित ६ लाख ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. यानंतर तक्रारदाराने ११ ऑगस्ट रोजी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली.  

हॉटेल ग्रीन पार्कमध्ये रचला सापळा
एसीबीने ११ आणि १२ ऑगस्ट रोजी धुळे जिल्हा परिषदेत पंचांसमक्ष पडताळणी केली. यामध्ये आरोपींनी आधीच १ लाख रुपये स्वीकारल्याचे मान्य करत तडजोडीअंती उर्वरित ५ लाख ८० हजार रुपयांची मागणी निश्चित केली. यातील उर्वरित ४ लाख ८० हजार रुपये सुपरवायझर बारकू पाटील यांच्याकडे देण्यास सांगण्यात आले.
त्यानुसार, १२ ऑगस्ट रोजी पारोळा शहरातील 'हॉटेल ग्रीन पार्क' येथे एसीबीच्या पथकाने सापळा रचला. बारकू पाटील याने पंचांसमक्ष ४ लाख ८० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच पथकाने त्याला रंगेहात ताब्यात घेतले. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.  

कारवाई करणारे पथक

ही यशस्वी कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे, कविता फडतरे आणि जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, हेमंत नागरे, सहाय्यक उपनिरीक्षक सुरेश पाटील, सुनील वानखेडे, किशोर महाजन, बाळू मराठे, राकेश दुसाने, सचिन चाटे, प्रणेश ठाकूर व मनोज पाटील यांच्या पथकाने केली.

Comments

No comments yet.