पुणे, (प्रतिनिधी) १३ ऑगस्ट - पुणे–नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मूळ मार्ग बदलण्याच्या हालचालींवर शिरुर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल रामसिंग कोल्हे यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. नारायणगाव येथील 'जीएमआरटी' (GMRT - जायंट मेट्रवेव्ह रेडिओ टेलिस्कोप) दुर्बिणीचे कारण देत रेल्वेचा मूळ मार्ग बदलण्यापेक्षा जागतिक स्तरावरील तंत्रज्ञानाचा अभ्यास करून त्यावर तांत्रिक तोडगा काढणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डॉ. कोल्हे यांनी केले आहे.
जागतिक दाखले आणि तांत्रिक पर्यायांची मांडणी
जगात अनेक ठिकाणी अतिसंवेदनशील रेडिओ दुर्बिणी आणि रेल्वे प्रकल्प एकत्र कार्यरत आहेत. यासाठी विविध देशांनी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून मार्ग काढला आहे. यासंदर्भात डॉ. कोल्हे यांनी जगातील प्रमुख १९ वेधशाळा आणि त्यांच्या परिसरातील वाहतूक व्यवस्थेचे दाखले दिले आहेत:
जर्मनी: एफेल्सबर्ग आणि वेट्झेल वेधशाळा
ऑस्ट्रेलिया: ASKAP आणि पार्क्स दुर्बीण
दक्षिण आफ्रिका: मीरकॅट दुर्बीण
अमेरिका: ग्रीन बँक, VLA आणि अरेसिबो वेधशाळा
चीन: FAST टेलिस्कोप आणि शांघाय वेधशाळा
युरोप व इतर देश: LOFAR (नेदरलँड्स), जोड्रेल बँक (यूके), नान्से (फ्रान्स), नोबेयामा (जपान) आणि DRAO (कॅनडा)
"जगात जर रेडिओ टेलिस्कोप आणि रेल्वे एकत्र नांदू शकतात, तर भारतात ते का शक्य नाही?" असा सवाल करत त्यांनी शास्त्रज्ञ व अभियंत्यांनी या तांत्रिक उपायांचा अभ्यास करण्याची गरज व्यक्त केली.
विकास आणि विज्ञान यांचा समतोल आवश्यक
GMRT चे वैज्ञानिक महत्त्व अनन्यसाधारण असून त्याचे संरक्षण झालेच पाहिजे, याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. मात्र, एका प्रकल्पाच्या संरक्षणासाठी दुसऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा मार्ग बदलणे अयोग्य आहे. पुणे आणि नाशिक दरम्यानचा औद्योगिक व कृषी पट्टा लक्षात घेता, मूळ सरळ मार्ग हा महाराष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी अत्यंत कणा मानला जातो.
"एक प्रकल्प वाचवण्यासाठी दुसऱ्याचा मार्ग वळवण्याऐवजी, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे दोन्ही प्रकल्प एकत्र कसे यशस्वी करता येतील, याचा गांभीर्याने विचार व्हावा. इच्छाशक्ती असेल तर पुणे-नाशिक रेल्वे मूळ सरळ मार्गानेच धावू शकते," असा विश्वास डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला आहे.