मुंबई, (प्रतिनिधी)) ११ ऑगस्ट - शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT)-२०२५ अंतर्गत पवित्र पोर्टलमार्फत (Pavitra Portal) सुरू असलेल्या शिक्षक पदभरती प्रक्रियेत उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. पोर्टलमार्फत प्राधान्यक्रम (Preferences) लॉक करण्याची मुदत आता ११ ऑगस्टऐवजी १३ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. संकेतस्थळावरील तांत्रिक ताण आणि उमेदवारांना येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.
सध्या पवित्र पोर्टलवर स्व-प्रमाणपत्र पूर्ण केलेल्या १,७०,१०८ उमेदवारांची प्राधान्यक्रम जनरेट करणे व लॉक करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
प्राधान्यक्रमांची सद्यस्थिती (१० ऑगस्ट सायंकाळी ६ वाजेपर्यंत):
मुलाखतीशिवाय पदभरती: १,१०,७६५ उमेदवारांचे प्राधान्यक्रम जनरेट झाले असून, त्यापैकी १९,४४५ उमेदवारांनी ते लॉक केले आहेत.
मुलाखतीसह पदभरती: ९२,८९४ उमेदवारांचे प्राधान्यक्रम जनरेट झाले असून, त्यापैकी ७,६७२ उमेदवारांनी ते लॉक केले आहेत.
ओटीपी (OTP) आणि तांत्रिक अडचणींसाठी महत्त्वाच्या सूचना:
ओटीपीसाठी घाई करू नका: एकाच वेळी जास्त लॉगिन असल्यामुळे ओटीपी येण्यास विलंब होऊ शकतो. ओटीपी न मिळाल्यास काही वेळ प्रतीक्षा करावी, लगेच 'रिसेंड' (Resend) वर क्लिक करू नये. उशिरा आलेला ओटीपीदेखील स्वीकारला जातो.
ब्राउझर कॅशे क्लिअर करा: लॉगिन करताना अडचण येत असल्यास वापरत असलेल्या इंटरनेट ब्राउझरची 'हिस्ट्री' आणि 'कॅशे' (Cache) क्लिअर करावी.
'इन्कॉग्निटो विंडो'चा वापर: समस्या कायम राहिल्यास 'इन्कॉग्निटो' (Incognito) किंवा 'प्रायव्हेट विंडो'चा वापर करून लॉगिन करावे.
आदिवासी विकास विभागाबाबत महत्त्वाची नोंद:
आदिवासी विकास विभागाच्या उच्च माध्यमिक विभागातील विज्ञान शाखेच्या बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स या विषयांचे प्राधान्यक्रम इंग्रजी माध्यमातील उमेदवारांना विभागाच्या ८ ऑगस्ट २०२६ च्या पत्रानुसार उपलब्ध करून दिले जात आहेत, याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.