कुंभमेळा तयारी... भाविकांच्या सुविधेसाठी चौंडी, शिर्डी अन् शिंगणापूर सज्ज होणार...

Share:
Main Image
Last updated: 10-Aug-2026

अहिल्यानगर, (प्रतिनिधी) १० ऑगस्ट - चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीस्थळांचे जतन व संवर्धन करण्यासोबतच नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी आणि शनिशिंगणापूर येथील प्रस्तावित विविध विकासकामांना गती देण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले आहेत. दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

बैठकीत चौंडी, शिर्डी आणि शनिशिंगणापूर येथील विकासकामांचे नियोजन, सध्याची स्थिती आणि आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीतील महत्त्वाचे निर्णय व निर्देश:

चौंडी येथील स्मृतीस्थळ संवर्धन: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीस्थळाचे जतन, संवर्धन आणि प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत प्रस्तावित विकासकामांचे योग्य नियोजन करून कामाचा वेग वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Advertisement

पुतळा उभारणी व भूसंपादन: चौंडी येथे पुतळा उभारणीसाठी आवश्यक समिती स्थापन करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, तसेच प्रस्तावित आराखड्यानुसार आवश्यक जमिनीच्या भूसंपादनाची कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले.

नाशिक कुंभमेळ्याचे नियोजन (शिर्डी व शनिशिंगणापूर): कुंभमेळ्याच्या काळात शिर्डी आणि शनिशिंगणापूर येथे भाविकांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेता रस्ते, वाहनतळ (पार्किंग) आणि इतर पायाभूत सुविधांची कामे जलदगतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.

पार्किंगची जागा व घोडेगाव एमआयडीसी: संभाजीनगर आणि अहिल्यानगर मार्गाने येणाऱ्या भाविकांसाठी पार्किंगची जागा निश्चित करण्याचे आदेश दिले गेले. घोडेगाव एमआयडीसी परिसरात किती जागा उपलब्ध आहे व तेथे किती वाहने पार्क होऊ शकतात, याची प्रत्यक्ष खातरजमा करून प्रस्ताव सादर करण्यास सांगण्यात आले.

शिर्डी शहरातील रस्ते: शिर्डी नगरपरिषद हद्दीतील प्रलंबित रस्त्यांची कामे मुदतीत पूर्ण करावीत आणि कुंभमेळ्यासाठी आवश्यक असणाऱ्या इतर कामांचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

या आढावा बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Comments

No comments yet.