रायगड, (प्रतिनिधी) १० ऑगस्ट - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे सध्या रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून रविवारी (९ ऑगस्ट) त्यांनी माणगाव येथे पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था, कंत्राटदारांची टक्केवारी आणि कोकणातील प्रस्तावित प्रकल्पांवरून राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला.
राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे:
मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था: राजकीय हस्तक्षेप आणि कामापेक्षा 'टक्केवारी'च्या विचाराला प्राधान्य दिल्यामुळेच कंत्राटदार कंटाळून सोडून गेले आणि महामार्गाचे काम रखडले. "काही दिवसांत रस्ता सुरू होईल हे आपण गेली १५ वर्षे ऐकत आहोत, आता पुन्हा गणेशोत्सवात चाकरमानी खड्ड्यांत अडकल्याच्या बातम्या येतील," असा टोला त्यांनी लगावला.
अशा विकासाचा काय उपयोग?: आमच्या जमिनी, आमचे पाणी आणि आपलीच वीज वापरून जर परप्रांतीय व बाहेरचे लोक पोसले जाणार असतील, तर अशा विकासाचा स्थानिक भूमिपुत्रांना काय उपयोग?
पालकमंत्रीपदाचा वाद क्षुल्लक: लोकांचे हित पाहणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे. मात्र, सध्या लोकांच्या प्रश्नांपेक्षा सत्ताधाऱ्यांमध्ये पालकमंत्रीपदावरून चाललेला वाद अत्यंत क्षुल्लक आणि लाजीरवाणा आहे.
'तिसरी मुंबई' अन् स्थानिकांचे अस्तित्व: कोकणात 'तिसऱ्या मुंबई'चा प्रकल्प येतोय, पण स्थानिक तरुणांना याची काहीच कल्पना नाही. बाहेरच्या राज्यातील तरुणांना आधीच माहिती मिळून ते तयारी करून येतात, तर महाराष्ट्रातील तरुण अंधारात राहतात.
जमीन विकू नका: "तुमचे अस्तित्व तुमच्या पायाखालच्या जमिनीवर अवलंबून आहे. जेव्हा तुम्ही ती जमीन विकता, तेव्हा तुमचे अस्तित्व संपते," असे सांगत त्यांनी स्थानिकांना जमिनी न विकण्याचे आवाहन केले.