पुढे वीर परिवार, मागे मंत्री-प्रशासन... जळगावात शिस्तबद्ध संचलनाने आणि लष्करी बँडच्या गजरात शहीदांचा गौरव...

Share:
Main Image
Last updated: 09-Aug-2026

 

 

जळगाव प्रतिनिधी

“देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांचे ऋण आपण कधीही फेडू शकत नाही. त्यांच्या त्यागाची स्मृती जपणे, कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आणि भावी पिढीसमोर त्यांचे शौर्य जिवंत ठेवणे हीच शहीदांना खरी मानवंदना आहे. शहीदांचे बलिदान हा राष्ट्राच्या स्वाभिमानाचा अमूल्य ठेवा आहे,” असे भावनिक प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

ऑगस्ट क्रांतिदिनाचे औचित्य साधून जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित ‘शहीद स्मारक भूमिपूजन व कृतज्ञता सोहळा’ तसेच ‘वीर माता, वीर पिता, वीर पत्नी सन्मान सोहळ्या’त ते बोलत होते. यावेळी जिल्ह्यातील २९ शहीद जवानांच्या स्मारकांचे भूमिपूजन करण्यात आले असून शहीद कुटुंबीयांना सूती तिरंगा हार व शाल देऊन सन्मानित करण्यात आले.

सोहळ्याची प्रमुख वैशिष्ट्ये:

वीर परिवारास अग्रस्थान:
पोलीस बँडच्या सुरांत वीर माता, वीर पिता व वीर पत्नी अग्रभागी आणि त्यांच्या मागे मंत्री व लोकप्रतिनिधी अशा शिस्तबद्ध संचलनाने भूमिपूजन स्थळाकडे प्रयाण करण्यात आले.

२९ गावांची माती एकत्र:
२९ गावांतील स्वतंत्र कलशांतून आणलेली वीरभूमीची माती एकत्र करून अनोख्या पद्धतीने भूमिपूजन पार पडले. हा उपक्रम राज्यात प्रथमच राबवला जात असून तो ‘जळगाव पॅटर्न’ म्हणून ओळखला जात आहे.

माहितीपटातून ३२ जवानांच्या शौर्याला उजाळा:
जिल्ह्यातील ३२ शहीद जवानांच्या त्याग व पराक्रमावर आधारित विशेष माहितीपट प्रदर्शित करण्यात आला.

Advertisement

“तिरंगे में लिपटा बेटा जब आख़िरी बार घर आया होगा,

आँखें माँ की रोई होंगी, मगर सिर गर्व से ऊँचा हुआ होगा...”

— पालकमंत्र्यांनी या ओळी गुणगुणताच संपूर्ण सभागृहाचे डोळे पाणावले.

संजय सावकारे (वस्त्रोद्योग मंत्री):
“जवानांच्या बलिदानामुळेच आपण सुरक्षित आहोत. ही स्मारके नव्या पिढीत देशसेवेची भावना रुजवणारी प्रेरणास्थळे ठरतील.”

सुरेश भोळे (आमदार):
“शहीदांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी शासन खंबीर असून, मुलांचे शिक्षण व इतर अडचणी सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल.”

किशोर पाटील (आमदार):
“शहीद कुटुंबीयांना घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णय महत्त्वपूर्ण असून, गावागावांत ग्रंथालयांसह स्मारके उभारणे हा स्तुत्य उपक्रम आहे.”

रोहन घुगे (जिल्हाधिकारी):
“शहीदांचे स्मरण कायम राहावे आणि भावी पिढीला राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळावी हाच या आयोजनाचा मुख्य उद्देश आहे.”

या सोहळ्यास आमदार, वरिष्ठ प्रशासकीय व पोलीस अधिकारी, सैनिक कल्याण कार्यालयाचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षल पाटील यांनी तर आभार प्रदर्शन विश्वनाथ उगले यांनी केले.

 

Comments

No comments yet.