पुणे, (प्रतिनिधी) ९ ऑगस्ट - पुणेकरांसाठी 'MH-12' हा केवळ एक आरटीओ (RTO) कोड नसून ती शहराची एक वेगळी आणि स्वाभिमानी ओळख बनली आहे. मात्र, पुण्यात दिवसेंदिवस प्रचंड वेगाने वाढणाऱ्या वाहनसंख्येमुळे या 'MH-12' नंबरप्लेटची नोंदणी मर्यादा आता संपण्याच्या मार्गावर आली आहे. पुणे आरटीओमधील सध्याची अंतिम 'ZZ' अक्षरमालिका येत्या १० ते १५ दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता असल्याने नव्या वाहनांच्या नोंदणीसाठी कोणता क्रमांक वापरायचा, असा मोठा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.
सध्या पुणे आरटीओत दुचाकींसाठी 'ZY' आणि चारचाकी वाहनांसाठी 'ZW' ही मालिका सुरू आहे. 'ZZ' ही शेवटची मालिका संपल्यानंतर सध्याची नोंदणी रचना संपुष्टात येईल.
'MH-61' ला पुणेकरांचा विरोध; ओळख जपण्याचा प्रयत्न
वाढत्या गरजेपोटी पुण्यासाठी 'MH-61' हा नवा आरटीओ कोड देण्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, पुणेकर आणि लोकप्रतिनिधींनी या प्रस्तावाला जोरदार विरोध दर्शवला आहे. मुंबईसाठी 'MH-01', ठाण्यासाठी 'MH-04' आणि नागपूरसाठी 'MH-31' प्रमाणेच 'MH-12' हे पुण्याशी भावनिक आणि ओळखीच्या दृष्टीने घट्ट जोडले गेले आहे.
काय आहे नवा प्रस्ताव?
पुणेकरांच्या तीव्र भावना लक्षात घेता 'MH-12' पूर्णपणे बंद करण्याऐवजी तो कोड कायम ठेवून त्याच्यासोबतच नवीन पद्धतीचा आरटीओ कोड देण्याचा पर्याय विचाराधीन आहे. या
प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास:
पुण्यातील जुन्या वाहनांचा 'MH-12' हा कोड कायम राहील.
नव्या नोंदणी होणाऱ्या वाहनांना एका वेगळ्या रचनेचा (असा प्रयोग भारतात पहिल्यांदाच होऊ शकतो) आरटीओ कोड दिला जाईल.
या मध्यमार्गामुळे पुण्याची पारंपरिक ओळखही जपली जाईल आणि वाढत्या वाहनसंख्येची नोंदणी अडचणही दूर होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.