सहकार क्षेत्रासाठी अमित शहा यांची मोठी घोषणा... महाराष्ट्राला होणार हा फायदा...

Share:
Main Image
Last updated: 09-Aug-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ९ ऑगस्ट - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेले २०४७ पर्यंतच्या 'विकसित भारत' घडवण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिक आर्थिकदृष्ट्या समृद्ध होणे गरजेचे आहे. यासाठी स्वयंरोजगाराची भक्कम परिसंस्था उभारणे आवश्यक असून, हे महत्त्वपूर्ण काम नागरी सहकारी बँकाच (UCBs) उत्तमरित्या करू शकतील, असा विश्वास केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला.

मुंबईतील मुंबई शेअर बाजाराच्या (BSE) आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित 'सहकार नव क्रांती' या विशेष कार्यक्रमात ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी अमित शाह यांच्या हस्ते राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या (NUCFDC) नवीन वास्तूचे (शारदा सदन, फोर्ट) उद्घाटन करण्यात आले. तसेच, नागरी सहकारी बँकांसाठी 'सुरक्षा कार्यान्वयन केंद्र' (Security Operations Centre - SOC) आणि 'बँक इन अ बॉक्स' अंतर्गत कोर बँकिंग (Sahkar CBS) व संलग्न सेवांचा शुभारंभ करण्यात आला.

या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्री जयकुमार रावल, आशिष शेलार आणि NUCFDC चे अध्यक्ष ज्योतिन्द्र मेहता यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

छोट्या बँकांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा पुढाकार
नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राची व्याप्ती आणि या क्षेत्रातील महाराष्ट्राचे योगदान लक्षात घेऊन NUCFDC चे मुख्यालय दिल्लीहून महाराष्ट्रात हलवण्याची महत्त्वपूर्ण घोषणा अमित शाह यांनी केली. देशातील १४०० नागरी सहकारी बँकांपैकी सर्वाधिक ४४९ बँका महाराष्ट्रात आहेत.

केंद्रीय सहकार मंत्र्यांनी स्पष्ट केले की, छोट्या नागरी सहकारी बँकांना स्वतंत्रपणे आधुनिक तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, आणि AI यंत्रणा खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसते. त्यामुळे ही शिखर संस्था (NUCFDC) सर्व बँकांच्या वतीने सामूहिक करार करून अत्यल्प खर्चात तंत्रज्ञानाची पायाभूत सुविधा उपलब्ध करून देईल.

Advertisement

महत्त्वाच्या घोषणा आणि सुधारणा:
'बँक इन अ बॉक्स' सेवा: एकाच एकात्मिक मंचावर कोअर बँकिंग, डिजिटल पेमेंट, क्लाउड सेवा आणि नियामक अनुपालन (Regulatory Compliance) उपलब्ध.
डिजिटल सुरक्षेसाठी NFSU सोबत करार: नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीच्या (NFSU) सहकार्याने बँकांमधील सायबर सुरक्षा, 'म्युलहंटर' सारख्या AI आधारित फ्रॉड डिटेक्टिव्ह प्रणाली आणि डिजिटल फॉरेन्सिक सुविधा पुरवल्या जातील.

२४ तास सायबर देखरेख: सिक्युरिटी ऑपरेशन्स सेंटरच्या (SOC) माध्यमातून बँकांना continuous सायबर सुरक्षा मिळेल.
आरबीआय नियमांमधील शिथिलता: पूर्वपरवानगीशिवाय १५% नवीन शाखा उघडण्याची मुभा, डोअरस्टेप बँकिंग, प्राधान्य क्षेत्र कर्जपुरवठ्याचे (PSL) उद्दिष्ट ७५% वरून ६०% करणे, आणि NPA खात्यांसाठी 'ग्लाईड पाथ' व OTS ची सुविधा लागू.

अमित शाह यांनी सर्व १४०० नागरी सहकारी बँकांना पुढील वर्षभरात या शिखर संस्थेचे सदस्य होण्याचे आवाहन केले. अमूल, इफ्को, कृभको आणि लिज्जत पापडचे उदाहरण देत त्यांनी सांगितले की, सहकाराच्या ताकदीवरच लहान भांडवलातून मोठी आर्थिक क्रांती घडवता येते.

या प्रसंगी जी. पी. मिस्त्री लिखित 'ऑपरेशनल रिस्क मॅनेजमेंट' या पुस्तकाचे आणि सहकारी बँकिंगच्या इतिहासावरील कॉफी-टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले. तसेच 'सहकार सीबीएस' प्रणालीशी जोडल्या गेलेल्या पहिल्या ६ नागरी सहकारी बँकांच्या प्रतिनिधींचा सत्कारही करण्यात आला.

?s=20

Comments

No comments yet.