E20 पेट्रोल खरोखरच सुरक्षित? तेल कंपन्यांनी घेतली चाचणी... काय आढळलं त्यात?

Share:
Main Image
Last updated: 09-Aug-2026

नवी दिल्ली, (प्रतिनिधी) ९ ऑगस्ट - इथेनॉल मिश्रित E20 पेट्रोलमध्ये (E20 Petrol) पाणी आणि क्लोराइडचे प्रमाण जास्त आढळत असल्याबाबत पसरणाऱ्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) देशभरात अतिरिक्त सखोल तपासणी मोहीम राबवली आहे. या वैज्ञानिक चाचण्यांच्या निष्कर्षांनुसार E20 इंधनाची गुणवत्ता पूर्णपणे सुरक्षित असून ५०० ppm (प्रति दशलक्ष भाग) क्लोराइड असल्याचा दावा पूर्णपणे फोल ठरला आहे.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अंतर्गत तेल कंपन्यांनी शुद्धीकरण कारखाने, इथेनॉल निर्मिती केंद्र, डेपो आणि थेट पेट्रोल पंपांपर्यंत पुरवठा साखळीच्या सर्व टप्प्यांवर आकस्मिक चाचण्या घेतल्या.

तपासणीचे मुख्य निष्कर्ष:
तेल शुद्धीकरण कारखाने (Refineries): १०० हून अधिक नमुन्यांच्या चाचणीत क्लोराइडचे प्रमाण अवघे १ ppm किंवा त्याहून कमी आढळले.

इथेनॉल निर्मिती केंद्र (Distilleries): ८० केंद्रांमधील तपासणीत इथेनॉलमध्ये क्लोराइडचे प्रमाण ३ ppm पेक्षा कमी नोंदवले गेले.

Advertisement

इंधन डेपो आणि टँकर: देशभरातील विविध वितरण केंद्रांवरील नमुन्यांमध्ये क्लोराइडचे प्रमाण ३ ppm पेक्षा कमी निघाले.

पेट्रोल पंप (Retail Outlets): १००० पेक्षा जास्त नमुन्यांपैकी विश्लेषित झालेल्या नमुन्यांमध्ये क्लोराइडचे प्रमाण अवघे ० ते ३ ppm दरम्यान आढळले (जे दाव्यानुसार ५०० ppm ऐवजी अतिशय नगण्य आहे). केवळ ४ ठिकाणी त्रुटी आढळल्याने तेथील विक्री त्वरित थांबवून सुधारणा करण्यात आली.

पाण्याचे अभिसरण (Water Ingress): देशातील ९०,००० पेट्रोल पंपांवरील भूगर्भातील टाक्यांची दररोज ८ ते १२ वेळा तपासणी केली जात असून, कुठेही पाण्याचे अभिसरण आढळलेले नाही.

केंद्र सरकारने इथेनॉल मिश्रणासाठी क्लोराइडचे अतिशय कठोर निकष प्रस्थापित केले आहेत. मोबाईल लॅब आणि सततच्या देखरेखीमुळे इंधनाची गुणवत्ता सर्वोच्च दर्जाची राखली जात आहे. ग्राहकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता E20 पेट्रोलचा वापर निधड्या छातीने करावा, असे आवाहन तेल विपणन कंपन्यांनी केले आहे.

Comments

No comments yet.