छत्रपती संभाजी नगर, (प्रतिनिधी) ९ ऑगस्ट - नाशिक आणि अहिल्यानगर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडी (नाथसागर) धरण १०० टक्के भरले असून मराठवाड्यावरील संभाव्य जलसंकट पूर्णपणे टळले आहे. या पार्श्वभूमीवर, छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते पैठण येथील नाथसागर जलाशयाचे विधिवत जलपूजन करण्यात आले. यावेळी गोदावरी नदीची साडी-चोळीने ओटी भरून श्रीफळ अर्पण करत निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
याप्रसंगी महापौर समीर राजूरकर, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, नगरसेवक हर्षदा शिरसाट, अधीक्षक अभियंता राजेंद्र धोडपकर, कार्यकारी अभियंता गणेश हासे, उपअभियंता श्रद्धा निंबाळकर, तहसीलदार ज्योती पवार, गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, पोलीस निरीक्षक महादेव गोमारे आदी उपस्थित होते.
पाण्याचे सुयोग्य नियोजन करण्याचे निर्देश:
जलपूजनानंतर बोलताना पालकमंत्री संजय शिरसाट म्हणाले की, जायकवाडी धरण हे मराठवाड्याची जीवनदायिनी असून शेती, उद्योग आणि पिण्याच्या पाण्याचा मुख्य आधार आहे. धरण पूर्ण भरल्याने मोठा दिलासा मिळाला असला, तरी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने आणि नियोजनबद्ध रीतीने करणे गरजेचे आहे. भविष्यात सिंचन, उद्योग किंवा पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी जलसंपदा विभागाने आतापासूनच जलवापराची सुयोग्य आखणी करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
आमदार विलास भुमरे यांनी सांगितले की, नाथसागरात झालेला हा जलसाठा मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी नवी आशा घेऊन आला आहे. या अमूल्य जलसंपत्तीचे जतन करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे संपूर्ण मराठवाड्यात आणि नाथसागर परिसरात शेतकरी व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.