नवी दिल्ली, (प्रतिनिधी) ९ ऑगस्ट - भारताच्या ईशान्येकडील राज्यांमधून सीमापार होणाऱ्या तस्करीविरोधात महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) मोठी मोहीम राबवून धडक कारवाई केली आहे. मिझोराम आणि आसाममध्ये केलेल्या तीन वेगवेगळ्या छाप्यांमध्ये म्यानमारमधून तस्करी करून आणलेले १५ किलो मेथॅम्फेटामाइन (याबा गोळ्या), ११ मेट्रिक टन परदेशी खसखस आणि १० मेट्रिक टन सुपारी जप्त केली असून, याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
रुग्णवाहिकेतून चालली होती १५ किलो अमली पदार्थांची वाहतूक
मिझोराममधील आयझॉल-चम्फाई मार्गावर वैद्यकीय आपत्कालीन सेवेच्या नावाखाली अमली पदार्थांची वाहतूक होत असल्याची माहिती DRI ला मिळाली होती. एका रुग्णवाहिकेची तपासणी केली असता, त्यात एक बनावट (डमी) रुग्ण झोपवून रुग्णाच्या बेडजवळ १५ किलो वजनाच्या 'मेथॅम्फेटामाइन' (याबा) गोळ्या लपवल्याचे आढळले. हा साठा म्यानमारहून मिझोराममार्गे आसामला पाठवला जात होता. NDPS कायद्यानुसार रुग्णवाहिकेसह अमली पदार्थ जप्त करून चालक व त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे.
आसाममध्ये खसखस आणि सुपारीच्या साठ्यावर धाडी
११ टन परदेशी खसखस जप्त: ५ आणि ६ ऑगस्टच्या मध्यरात्री DRI ने आसाम रायफल्सच्या मदतीने बदरपूर (जि. करीमगंज) येथील गोदामावर छापा टाकून १.६७ कोटी रुपये मूल्याची ११ मेट्रिक टन तस्करीची खसखस जप्त केली. हा साठा चहाच्या खोक्यांमध्ये लपवून ठेवला होता.
१० टन परदेशी सुपारी हस्तगत: ५ ऑगस्ट रोजी रंगिया रेल्वे स्थानकावर एका ट्रेनच्या पार्सल डब्यातून १ कोटी रुपये मूल्याच्या १० मेट्रिक टन (१२० पिशव्या) परदेशी सुपारीचा साठा जप्त करण्यात आला.
सीमावर्ती भागातून होणारी ही संघटित तस्करी रोखण्यासाठी आणि महसुलाचे नुकसान टाळण्यासाठी तपास यंत्रणांनी ईशान्य सीमेवर सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक केली आहे.
?s=20