नवी दिल्ली, (प्रतिनिधी) ८ ऑगस्ट - देशातील सनदी लेखापाल (CA), मुख्य वित्तीय अधिकारी (CFO), कंपनी संचालक आणि कॉर्पोरेट वित्त विभागाला लक्ष्य करणाऱ्या एका मोठ्या सायबर घोटाळ्याचा ('बॉस स्कॅम') पर्दाफाश झाला आहे. गृह मंत्रालयांतर्गत असलेल्या भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने (I4C) या संदर्भात इशारा जारी केला असून, व्हॉट्सॲप, एसएमएस आणि ई-मेलद्वारे पाठवल्या जाणाऱ्या फसव्या (Malicious) फाईल्सपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
काय आहे हा 'बॉस स्कॅम' अन् फसवणुकीची पद्धत?
बनावट फाईल्सचा वापर: संशयित व्हॉट्सॲप किंवा ई-मेलवर “Statement of Account.zip”, “RBI.zip” किंवा “MCA.zip” नावाने कॉम्प्रेस्ड फाईल्स पाठवतात. या फाईल्समध्ये धोकादायक विंडोज सॉफ्टवेअर (.exe आणि .dll) असतात.
व्हॉट्सॲप वेब हायजॅक: या फाईलवर क्लिक करताच ट्रोजन मालवेअर संगणकात इन्स्टॉल होतो आणि युझरचे सक्रिय WhatsApp Web लगेच हॅक करतो.
सीईओची बनावट ओळख: व्हॉट्सॲप हॅक झाल्यानंतर, हॅकर्स कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या (CEO/CFO) नावाने वित्त कर्मचाऱ्यांना संदेश पाठवून तातडीने बनावट बँक खात्यांमध्ये निधी (Fund Transfer) हस्तांतरित करण्याचे निर्देश देतात.
आय४सी (I4C) ची धडक कारवाई आणि सुरक्षा उपाय
५८,००० हून अधिक जणांना एसएमएस अलर्ट: गेल्या ३० दिवसांत I4C ने ‘I4CMHA-G’ या अधिकृत एसएमएस हेडरद्वारे ५८,००० हून अधिक संभाव्य पीडितांना सावध केले आहे.
१०,००० भारतीयांचे संरक्षण: सी२ (C2) सर्व्हर्स जिओ-ब्लॉक करून १० हजारहून अधिक नागरिकांचे संरक्षण करण्यात आले आहे.
सुरक्षा कंपन्यांसोबत तांत्रिक माहिती शेअर: CERT-In, मायक्रोसॉफ्ट आणि 'क्विक हील', 'के७', 'नेट प्रोटेक्टर'सारख्या अँटी-व्हायरस कंपन्यांशी या मालवेअरचे तांत्रिक तपशील सामायिक करण्यात आले आहेत.
नागरिकांसाठी आणि कंपन्यांसाठी मार्गदर्शक सूचना
पडताळणी करा: व्हॉट्सॲप किंवा ई-मेलवरून आलेल्या कोणत्याही पैशांच्या हस्तांतरणाच्या किंवा बँक खात्यात बदल करण्याच्या सूचनांवर थेट फोन करून पडताळणी करा.
अज्ञात फाईल्स उघडू नका: अनोळखी स्रोतांकडून आलेल्या .zip किंवा .exe फाईल्स कधीही डाउनलोड करू नका. आरबीआय किंवा सरकारी संस्था व्हॉट्सॲपवरून अशा फाईल्स पाठवत नाहीत.
लिंक्ड डिव्हाइसेस तपासा: व्हॉट्सॲपच्या Settings > Linked Devices मध्ये जाऊन वापरात नसलेल्या सर्व वेब सेशन्सवरून तात्काळ लॉग आउट करा.