किम कार्दशियनचा हा प्रसिद्ध ब्रँड भारतात...  येथे उघडणार उघडणार पहिले स्टोअर्स...

Share:
Main Image
Last updated: 08-Aug-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ८ ऑगस्ट - जागतिक स्तरावर प्रचंड लोकप्रिय असलेला हॉलिवूड स्टार किम कार्दशियनचा फॅशन ब्रँड ‘स्किम्स’ (SKIMS) आता भारतीय बाजारपेठेत अधिकृतपणे पाऊल टाकत आहे. रिलायन्स रिटेल व्हेंचर्सचा भाग असलेल्या ‘रिलायन्स ब्रँड्स लिमिटेड’ने (RBL) स्किम्ससोबत विशेष भागीदारीची घोषणा केली आहे. या करारांतर्गत भारतातील पहिले फ्लॅगशिप स्टोअर्स दिल्ली आणि मुंबईमध्ये सुरू करण्यात येणार आहेत.

किम कार्दशियन आणि जेन्स ग्रेड यांनी २०१९ मध्ये स्थापन केलेला ‘स्किम्स’ हा ब्रँड महिलांचे अंतर्वस्त्र (Inners/Shapewear) आणि आरामदायी परिधानांसाठी (Loungewear) जगभरात प्रसिद्ध आहे. सर्वसमावेशकता आणि बॉडी-पॉझिटिव्हिटी या संकल्पनेवर आधारित असलेल्या या ब्रँडला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी मागणी आहे.

रिलायन्सकडे असणार डिजिटल आणि रिटेलची धुरा
या करारांतर्गत भारतातील स्किम्सच्या रिटेल स्टोअर्सचे संचालन तसेच ई-कॉमर्स व डिजिटल व्यवसायाची संपूर्ण जबाबदारी रिलायन्स ब्रँड्सकडे असेल. दिल्ली आणि मुंबईतील पहिल्या टप्प्यानंतर देशातील इतर प्रमुख मेट्रो शहरांमध्येही या ब्रँडचा विस्तार केला जाणार आहे.

Advertisement

"भारतीय ग्राहकांच्या आकांक्षा पूर्ण करणारा ब्रँड"
या भागीदारीवर बोलताना रिलायन्स रिटेल व्हेंचर्सच्या संचालक ईशा अंबानी म्हणाल्या, "शेपवेअर आणि कम्फर्टबाबत जगाचा दृष्टिकोन बदलण्यात स्किम्सचा मोठा वाटा आहे. आजची भारतीय ग्राहक पिढी ही जागतिक फॅशन आणि स्वतःच्या कम्फर्टबाबत अत्यंत जागरूक आहे. अशा ग्राहकांसाठी हा ब्रँड भारतात आणताना आम्हाला आनंद होत आहे."

किम कार्दशियनने व्यक्त केला आनंद
स्किम्सच्या सह-संस्थापक आणि मुख्य क्रिएटिव्ह अधिकारी किम कार्दशियन यांनी भारतीय बाजारपेठेतील प्रवेशाबद्दल उत्साह दाखवला. "प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या कपड्यांमध्ये आत्मविश्वासपूर्ण आणि आरामदायी वाटावे, याच ध्येयाने स्किम्स सुरू झाले. भारतीय ग्राहकांकडून मिळालेला भरघोस प्रतिसाद पाहाता भारतात विस्तार करताना आम्हाला खूप आनंद होत आहे," असे त्या म्हणाल्या.

जागतिक फॅशन विश्वातील बडे ब्रँड्स सध्या भारताकडे मोठी बाजारपेठ म्हणून पाहत आहेत. अशातच रिलायन्स आणि स्किम्सच्या या भागीदारीमुळे भारतीय फॅशन आणि रिटेल क्षेत्राला नवी दिशा मिळेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

Comments

No comments yet.