मुंबई, (प्रतिनिधी) ७ ऑगस्ट - "महाराष्ट्रात रोजगार करायचा असेल, तर मराठीशी नाळ जोडलीच पाहिजे. प्रवाशांशी दोन प्रेमाचे शब्द मराठीत बोलणारा प्रत्येक चालक हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सन्मान करणारा दूत ठरतो," असे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियाना'अंतर्गत राज्यभरातील १ लाखांहून अधिक अमराठी व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांनी व्यवहारिक मराठी भाषेचे धडे यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. या मोहिमेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
या अभियानाच्या आढावा बैठकीस परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप ढवळ, मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
१५ ऑगस्टपर्यंत अंतिम संधी: राज्यातील उर्वरित सर्व अमराठी व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांनी १५ ऑगस्टपूर्वी या अभियानाचा लाभ घेऊन व्यवहारिक मराठी शिकावी, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.
अस्मितेचा आत्मा: मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि संस्कृतीचा आत्मा आहे. प्रवाशांशी मराठीत संवाद साधल्यास माणसांमधील आपुलकीचे बंध अधिक दृढ होतील, असे सरनाईक यांनी नमूद केले.
संयुक्त लोकचळवळ: राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग, मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या संयुक्त सहकार्याने हे अभियान राज्यभर यशस्वीरित्या राबवले जात आहे.
१७ ऑगस्टला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते समारोप:
१ मे पासून सुरू झालेल्या या अभियानाचा भव्य समारोप १७ ऑगस्ट रोजी ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत उपस्थित राहतील. याप्रसंगी हजारो चालकांना प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येईल.