पुणे, (प्रतिनिधी) ७ ऑगस्ट - प्रस्तावित पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाचा जुन्नर (पुणे) येथील खोडद येथील 'जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप' (GMRT) या संवेदनशील वैज्ञानिक प्रकल्पावर काय परिणाम होईल, याचा सखोल अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे. अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार आहे.
मूळ मार्गाचा पुनर्विचार: पुणे-नाशिक रेल्वेचा मूळ मार्ग नारायणगावजवळ असलेल्या 'जीएमआरटी' प्रकल्पाच्या जवळून जात होता. या संवेदनशील रेडिओ टेलिस्कोपच्या कामकाजात अडथळा निर्माण न करता मूळ रेल्वे मार्ग पुन्हा बहाल करता येईल का, याचा अभ्यास ही समिती करणार आहे.
वैज्ञानिक प्रकल्पाचे संरक्षण: जीएमआरटी ही जागतिक स्तरावरील अत्यंत संवेदनशील रेडिओ दुर्बीण (Radio Telescope) आहे. रेल्वे धावताना होणारे कंपने आणि विद्युतचुंबकीय लहरींमुळे (Electromagnetic interference) या प्रकल्पातील संशोधनात अडथळा येऊ नये, यासाठी तांत्रिक उपाययोजना आणि पर्यायी मार्गांची चाचपणी केली जात आहे.
रेल्वे प्रकल्पाला गती मिळण्याची शक्यता: तज्ज्ञ समितीच्या अहवालानंतर पुणे-नाशिक रेल्वे मार्गावरील तांत्रिक पेच सुटण्यास मदत होईल आणि या महत्त्वपूर्ण रेल्वे प्रकल्पाच्या कामाला गती मिळू शकेल.
आमदार सत्यजीत तांबे यांची प्रतिक्रिया
२५ फेब्रुवारी २०२६ रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मी मांडलेल्या प्रश्नावर उत्तर देतांना राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक - पुणे हायस्पीड रेल्वे साठी तज्ञांची समिती नेमण्याचे आश्वासन दिले होते, आज या समितीची घोषणा झाली या बाबत मला प्रचंड आनंद आहे.
जेवढे केंद्र सरकारचे रेल्वे मंत्रालय नकारात्मक आहे तेवढेच मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी या नाशिक-पुणे हाय स्पीड रेल्वे मार्गाबाबत सकारात्मक आहेत. त्यांच्या ह्या प्रयत्नांना बळ देण्यासाठीच क्रांती दिनी ९ ऑगस्ट २०२६ रोजी नाशिक -पुणे महामार्गावर चक्काजाम आंदोलन करुन जनभावना केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्र्यांपर्यंत पोहोचवायची आहे.
आपले आंदोलन कोणाच्या विरोधात नसून नाशिक -पुणे हाय स्पीड रेल्वे ही सिन्नर - अकोले - संगमनेर - नारायणगाव - आंबेगाव - राजगुरुनगर - चाकण मार्गे पुण्याला जाण्यासाठी आहे.
आपला नाशिक - शिर्डी मार्गाला तसेच अहिल्यानगर-पुणे सरळ मार्गालाही पूर्ण पाठिंबा आहे.
?s=20