मुंबई, (प्रतिनिधी) ६ ऑगस्ट - डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांमधील वाढता मानसिक तणाव, भावनिक असुरक्षितता आणि वर्तणुकीतील बदल ओळखून त्यांना योग्य वेळी मार्गदर्शन मिळवून देण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्यातील सर्व महाविद्यालये व विद्यापीठांमधील अध्यापकांसाठी ‘मानससूत्र’ हा राज्यस्तरीय उपक्रम राबवण्यात येणार असून, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते मंत्रालयात या उपक्रमाच्या अधिकृत पोस्टरचे अनावरण करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (MSFDA), पुणे यांच्या वतीने या उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० (NEP 2020) च्या उद्दिष्टांना अनुसरून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासोबतच त्यांच्या मानसिक व भावनिक स्वास्थ्याला प्राधान्य देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
'मानससूत्र' उपक्रमाची प्रमुख उद्दिष्टे आणि वैशिष्ट्ये:
प्रारंभिक लक्षणे ओळखणे: विद्यार्थ्यांच्या दैनंदिन संपर्कात असणाऱ्या अध्यापकांना विद्यार्थ्यांमधील भावनिक व वर्तणुकीतील बदलांची चिन्हे ओळखण्यासाठी सक्षम करणे.
बहुविद्याशाखीय दृष्टिकोन: यात मानसशास्त्रीय पायाभूत संकल्पना, संकट व्यवस्थापन, डिजिटल स्वास्थ्य, समावेशक शिक्षण पद्धती आणि भारतीय ज्ञान परंपरा (IKS) यांची सांगड घातली जाईल.
सुरक्षित परिसर निर्मिती: भावनिकदृष्ट्या सुरक्षित, समावेशक आणि भेदभावरहित महाविद्यालयीन वातावरण तयार करण्यास प्रोत्साहन देणे.
मार्गदर्शन व समुपदेशन: संकट ओळखणे, तात्काळ प्रतिसाद देणे आणि गरजेनुसार योग्य तज्ज्ञांकडे विद्यार्थ्यांना निर्देशित (Referral) करण्यासाठी व्यावहारिक कार्यनीती उपलब्ध करून देणे.
१० ते १२ ऑगस्ट दरम्यान पुणे येथे प्रशिक्षण:
या उपक्रमांतर्गत राज्यस्तरीय अध्यापक विकास कार्यक्रम दि. १० ऑगस्ट २०२६ ते १२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (MSFDA), पुणे येथे आयोजित केला जाणार आहे. राज्यातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांतील शिक्षक यात सहभागी होतील.
पोस्टर अनावरण प्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणु गोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, सहसंचालक डॉ. अर्चना बोऱ्हाडे व उपसचिव अशोक मांडे उपस्थित होते.
?s=20