पत्नीच्या यकृतदानाने पतीला नवजीवन... अशी झाली आर्थिक मदतीची जुळवाजुळव...

Share:
Main Image
Last updated: 06-Aug-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ६ ऑगस्ट - अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे यकृत प्रत्यारोपणाचा खर्च उचलणे अशक्य झालेल्या अकोल्यातील प्रशांत इंगळे (वय ४७) यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि ‘टाटा ट्रस्ट’च्या मदतीमुळे नवजीवन मिळाले आहे. मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर यशस्वी यकृत प्रत्यारोपण (Liver Transplant) करण्यात आले असून, त्यांच्या पत्नी वर्षा इंगळे यांनी स्वतःच्या यकृताचा भाग दान करून पतीचे प्राण वाचवले आहेत.

अकोला येथे केबल टाकण्याचे काम करणारे प्रशांत इंगळे हे कुटुंबातील एकमेव कमावते व्यक्ती आहेत. सप्टेंबर-ऑक्टोबर २०२५ दरम्यान त्यांचे यकृत गंभीररीत्या निकामी झाल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी तातडीने यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला दिला, मात्र उपचारासाठी लागणारा २५ ते ३० लाख रुपयांचा खर्च या गरीब कुटुंबाच्या आवाक्याबाहेर होता.

अशी झाली आर्थिक मदतीची जुळवाजुळव

Advertisement

अकोल्याच्या आमदारांच्या सल्ल्याने इंगळे कुटुंबीयांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांची भेट घेतली. नाईक यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि केलेल्या पाठपुराव्यामुळे उपचारासाठी आवश्यक निधी उपलब्ध झाला:
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी: ₹२,००,०००
टाटा ट्रस्ट कडून मिळालेली मदत: ₹१९,६०,०००
एकूण मिळालेले आर्थिक सहाय्य: ₹२१,६०,०००

२५ जूनला यशस्वी शस्त्रक्रिया
उपलब्ध झालेल्या आर्थिक सहाय्यामुळे २५ जून २०२६ रोजी नानावटी रुग्णालयात प्रशांत इंगळे यांच्यावर यकृत प्रत्यारोपणाची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पार पडली. उपचारांना उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर १३ जुलै २०२६ रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून ते वेगाने बरे होत आहेत.

"वेळेवर मिळालेल्या आर्थिक मदतीमुळे आणि पत्नीच्या धाडसामुळे मला नवजीवन मिळाले आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रामेश्वर नाईक आणि टाटा ट्रस्टचे आम्ही मनापासून आभारी आहोत."
— प्रशांत इंगळे (रुग्ण)

"आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही गरजू रुग्णाचा उपचार पैशांअभावी थांबू नये, या उद्देशाने आमचा कक्ष सातत्याने कार्यरत आहे. प्रशांत इंगळे यांना वेळेत मदत करता आली याचा आनंद आहे. या निधीच्या अधिक माहितीसाठी नागरिकांनी १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा."
— रामेश्वर नाईक (प्रमुख, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष)

Comments

No comments yet.