सांगली, (प्रतिनिधी) ५ ऑगस्ट - जिल्ह्यातील मौजे बत्तीस शिराळा येथील जगप्रसिद्ध नागपंचमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी दिलेले आदेश आणि वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ मधील तरतुदींचे तंतोतंत पालन करण्याचे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. वन, महसूल आणि पोलीस प्रशासनाने दक्ष राहून कायदा-सुव्यवस्थेचे पालन करून हा सण साजरा करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बत्तीस शिराळा नागपंचमी उत्सव नियोजन बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस आमदार सत्यजीत देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, उपवनसंरक्षक सागर गवते, विभागीय वन अधिकारी प्रशांत वरूडे, पोलीस उपअधीक्षक अरुण पाटील यांच्यासह वन व पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
प्रशासनाकडून कडक बंदोबस्त आणि गस्त
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी सांगली जिल्ह्यात नागपंचमीदरम्यान ठेवण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली:
विशेष पथके तैनात: शिराळा व परिसरामध्ये बेकायदेशीरपणे नाग पकडण्यावर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाची विशेष गस्ती पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जनजागृती: अंधश्रद्धा दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोनातून सण साजरा करण्यासाठी पत्रके, भित्तिपत्रके आणि ध्वनिक्षेपकाद्वारे (Loudspeakers) व्यापक जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे.
साप पकडल्यास किंवा प्रदर्शन भरवल्यास 'या' कायद्यानुसार कारवाई
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार नाग किंवा कोणत्याही सापाला पकडणे, त्याचे प्रदर्शन करणे, त्यांना इजा पोहोचवणे किंवा त्यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट करणे हा गंभीर आणि दखलपात्र गुन्हा आहे:
वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ - कलम ९: वन्यजीवांना पकडणे, दुखापत करणे किंवा बंदी बनवणे गुन्हा ठरवते.
कलम ५१ नुसार शिक्षा: या कायद्याचे उल्लंघन केल्यास दोषसिद्धीनंतर ३ ते ७ वर्षांपर्यंतचा कारावास आणि किमान ₹२५,००० दंड किंवा दोन्ही शिक्षांची तरतूद करण्यात आली आहे.
असा कोणताही प्रकार आढळल्यास नागरिकांनी तात्काळ वन विभाग किंवा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
?s=20