चहाच्या टपरीवर घेतली लाच... सहाय्यक महसूल अधिकारी जाळ्यात...

Share:
Main Image
Last updated: 04-Aug-2026

नंदुरबार, (प्रतिनिधी) ४ ऑगस्ट - जमिनीचे ‘एम नमुना’ प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी आणि प्रकरण पुढे पाठवण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या तळोदा तहसील कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मंगळवारी (दि. ४) रंगेहाथ पकडले. रविंद्र निंबा कानडे (वय ५१) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, ३८ वर्षीय तक्रारदाराने मागील वर्षी एक एकर जमीन खरेदी करून ती आपल्या पत्नीच्या नावे नोटरी केली होती. या जमिनीचे ‘एम नमुना प्रमाणपत्र’ मिळवण्यासाठी त्यांनी तळोदा तहसील कार्यालयात अर्ज केला होता. हे प्रकरण सहाय्यक महसूल अधिकारी (वर्ग ३) रविंद्र कानडे याच्याकडे प्रलंबित होते.  

सदर काम करून देण्यासाठी आणि प्रकरण पुढे पाठवण्यासाठी कानडे याने तक्रारदाराकडे ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने ३ ऑगस्ट रोजी एसीबीच्या नंदुरबार कार्यालयात जाऊन तक्रार नोंदवली. एसीबीच्या पथकाने त्याच दिवशी तहसील कार्यालयात पडताळणी केली असता, कानडे याने लाच मागून ती स्वीकारण्यास मान्यता दिल्याचे स्पष्ट झाले.  

Advertisement

त्यानंतर मंगळवारी (दि. ४ ऑगस्ट) सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास तळोदा तहसील कार्यालयाच्या बाहेरील एका चहाच्या दुकानात सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांची लाच स्वतः स्वीकारताना कानडे याला पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले. या प्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.  

ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे व कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार एसीबीचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत भरते, पोलीस निरीक्षक संदीप पाटील तसेच अम अंमलदार विलास पाटील, देवराम गावीत, विजय ठाकरे, जितेंद्र महाले, हेमंतकुमार महाले आणि सुभाष पावरा यांच्या पथकाने केली.  

लाच मागितल्यास संपर्क साधण्याचे आवाहन:
कोणत्याही शासकीय कामासाठी लाच मागितल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल-फ्री क्रमांक १०६४ किंवा नंदुरबार एसीबीशी ०२५६४-२३१००९ / ९४२३५४१०६४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक प्रशांत भरते यांनी केले आहे.

Comments

No comments yet.