धुळे (प्रतिनिधी) ४ ऑगस्ट २०२६
न्यायालयात सुरू असलेल्या एका फसवणुकीच्या प्रकरणात तक्रारदाराच्या बाजूने सकारात्मक अहवाल पाठवण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागून तडजोडीअंती ४० हजार रुपये स्वीकारताना धुळ्यातील पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या पोलीस शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सोमवारी (दि. ३ ऑगस्ट) रंगेहात पकडले. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक (PSI) आणि पोलीस शिपाई अशा दोघांनाही ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
साईनाथ भानुदास तळेकर (वय ३६, पोलीस उपनिरीक्षक) आणि अविनाश अरविंद सादरे (वय ३१, पोलीस शिपाई, दोघे रा. पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन) अशी कारवाई करण्यात आलेल्या संशयित पोलीस अंमलदारांची नावे आहेत.
नेमकी काय आहे घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, ३५ वर्षीय तक्रारदार यांच्या सासऱ्यांच्या नावे मौजे वलवाडी (ता. जि. धुळे) येथे घर आहे. धुळे येथील एका दाम्पत्याने सदर घराच्या कागदपत्रांचा गैरवापर करून सन २०१५ मध्ये एका फायनान्स कंपनीकडून परस्पर ३६ लाख १० हजार रुपयांचे गृहकर्ज घेऊन फसवणूक केली होती. याप्रकरणी तक्रारदाराच्या सासऱ्यांनी धुळे न्यायालयात फौजदारी किरकोळ अर्ज दाखल केला आहे.
सदर अर्जावर तक्रारदाराच्या सासऱ्यांच्या बाजूने आरोपींवर गुन्हा दाखल करण्याबाबतचा सकारात्मक अहवाल कोर्टात पाठवण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर व पोलीस शिपाई अविनाश सादरे यांनी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
अशी झाली सापळा कारवाई
याबाबत तक्रारदाराने ३ ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (धुळे) कडे तक्रार नोंदवली. एसीबीच्या पथकाने त्याच दिवशी पंचांसमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली असता, ५० हजार रुपयांऐवजी ४० हजार रुपये लाच घेण्याचे संशयितांनी मान्य केले.
त्यानंतर पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या आवारात सापळा रचून पोलीस शिपाई अविनाश सादरे याला तक्रारदाराकडून ४० हजार रुपयांची रक्कम स्वतः स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जात आहे.
सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (नाशिक परिक्षेत्र) च्या पोलीस अधीक्षक कविता फडतरे, अपर पोलीस अधीक्षक भारत तांगडे व प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, पद्मावती कलाल आणि पथकाने केली.