मुंबई, (प्रतिनिधी) ४ ऑगस्ट - गेल्या दोन-तीन दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे आणि माध्यमांमध्ये येत असलेल्या बातम्यांमुळे चिंता व्यक्त करणाऱ्या सर्व हितचिंतकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियाद्वारे स्पष्टीकरण दिले आहे. "काळजीचे कोणतेही कारण नसून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील काही दिवस विश्रांती घेणार आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.
सोशल मीडिया पोस्टमध्ये नक्की काय म्हणाले रोहित पवार?
आमदार रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत संदेशात म्हटले आहे:
"गेले २-३ दिवस तब्येत साथ देत नसल्याने आणि याबाबत आज माध्यमांमधील बातम्या पाहून अनेक हितचिंतक फोन करतायत. आपल्या काळजीबद्दल धन्यवाद, पण काळजीचे काहीही कारण नाही. व्हायरल फ्लू किंवा इतर काही कारण आहे का, याबाबत तपासणी सुरू आहे.
खरं तर डॉक्टरांनी आजार अंगावर न काढता सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला, पण युवा पिढी शांत बसणारी नसते. तुमच्या सदिच्छाही पाठीशी आहेतच. त्यामुळं पुढील काही दिवस पती, मुलगा, वडील, भाऊ, जावई, मित्र या कौटुंबिक नात्यांसाठी जमेल तशी विश्रांती घेणार आहे पण एक लोकप्रतिनिधी म्हणून लोकांप्रती असलेलं कर्तव्यही प्रामाणिकपणे पार पाडतच राहणार आहे.
लवकरच पूर्णतः बरा होऊन नव्या ऊर्जेने असंच काम सुरु राहील.!"
— रोहित पवार (आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवार)
सततचा प्रवास अन् धावपळीमुळे प्रकृती अस्वस्थ
गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातील राजकीय दौरे, बैठका आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींमुळे झालेला ताण, तसेच तापाची लक्षणे आणि अशक्तपणा जाणवू लागल्याने डॉक्टरांनी त्यांना वैद्यकीय चाचण्या करून विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
दरम्यान, रोहित पवार यांनी आपल्या प्रकृतीबाबत स्वत: स्पष्टीकरण दिल्यामुळे त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांमधील चिंतेचे वातावरण दूर झाले असून सर्व स्तरांतून ते लवकर बरे व्हावेत यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.