जळगाव बायपासवरील पूल खचला... दोन्ही मंत्र्यांची घटनास्थळी धाव... थेट नितीन गडकरींना फोन...

Share:
Main Image
Last updated: 03-Aug-2026

जळगाव, (प्रतिनिधी) ३ ऑगस्ट - जळगाव शहरालगत पाळधी–तरसोद बायपास महामार्गावरील पुलाचा काही भाग दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे खचला होता. या खचलेल्या पुलाची राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी (३ ऑगस्ट) प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

या पाहणीदरम्यान आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे, नशिराबादचे नगराध्यक्ष योगेश पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे, महानगरपालिका आयुक्त आदित्य जीवने यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय तज्ज्ञ पथकाची मागणी; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशी संपर्क

पाहाणीदरम्यान आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाशी दूरध्वनीवरून संपर्क साधून या घटनेची सविस्तर माहिती दिली. पुलाची तातडीने तांत्रिक पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे तज्ज्ञ पथक पाठवण्यात यावे आणि नुकसानीचे सर्वेक्षण करून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करावे, अशी विनंती त्यांनी केली.

Advertisement

पर्यायी वाहतूक आणि सुरक्षेला प्राधान्य

पावसाच्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे पुलाच्या संरचनेला झालेल्या नुकसानीची माहिती घेतल्यानंतर, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासनाला नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आदेश दिले. "सर्व संबंधित यंत्रणांनी आपापसात समन्वय ठेवून दुरुस्तीची प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी आणि पर्यायी वाहतूक व्यवस्था प्रभावीपणे राबवून नागरिकांना कोणताही धोका होणार नाही याची दक्षता घ्यावी," असे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली, तर पोलीस प्रशासनाने वाहतुकीचे योग्य नियोजन केल्याचे स्पष्ट केले. या प्रसंगी उपविभागीय अधिकारी विनय गोसावी, तहसीलदार शीतल राजपूत आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.

?s=20

Comments

No comments yet.