नाव मोठं, काम खोटं... रेल्वे स्टेशनजवळील दुकानात उघड झाला हा धक्कादायक प्रकार...

Share:
Main Image
Last updated: 02-Aug-2026

नवी मुंबई, (प्रतिनिधी) २ ऑगस्ट - भारतीय मानक ब्युरोच्या (BIS) मुंबई शाखेने वाशी रेल्वे स्थानक परिसरातील एका इलेक्ट्रॉनिक्स दुकानावर धडक कारवाई करत अवैध बीआयएस (BIS) नोंदणी चिन्हे असलेली विविध उपकरणे जप्त केली आहेत. ग्राहकांची फसवणूक थांबवणे आणि मानकांचा गैरवापर रोखणे या उद्देशाने ही शोध व जप्ती मोहीम राबवण्यात आली.

वाशी रेल्वे स्थानकावरील ‘मे. वोन एंटरप्रायझेस / व्हीएचएच कम्युनिकेशन’ या दुकानावर बीआयएस अधिकाऱ्यांनी छापा टाकला. या कारवाईत रिअलमी (Realme), एमआय (Mi) ब्रँडचे पॉवरबँक्स, बोट (boAt), रिअलमीचे इअरबड्स आणि लुनो (Luno) ब्रँडचे वायरलेस हेडसेट्स अशी एकूण १२ इलेक्ट्रॉनिक उत्पादने जप्त करण्यात आली आहेत.

तपासात धक्कादायक प्रकार उघड

तपासणीदरम्यान बीआयएस अधिकाऱ्यांना अनेक अनियमितता आढळून आल्या:

दुसऱ्याच उत्पादनाचा नोंदणी क्रमांक: एका उत्पादनावर दाखवलेला नोंदणी क्रमांक प्रत्यक्षात दुसऱ्याच उत्पादनाचा असल्याचे समोर आले.

नोंदणीच्या कक्षेबाहेरील उत्पादने: काही उपकरणांचे उपप्रकार बीआयएस नोंदणीच्या अधिकृत कक्षेमध्ये समाविष्टच नव्हते.

अशा प्रकारे बेकायदेशीर चिन्हांचा वापर करून ही उत्पादने ग्राहकांना विकली जात होती. हे भारतीय मानक ब्युरो कायदा, २०१६ च्या कलम १७ चे थेट उल्लंघन आहे.

Advertisement

दोन वर्षांचा तुरुंगवास आणि लाखोंचा दंड होणार!

याप्रकरणी बीआयएस संबंधित दुकानावर फौजदारी तक्रार (Criminal Case) दाखल करणार आहे. कायद्यातील कलम १७ व २९ नुसार:

पहिली वेळ उल्लंघन: २ लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा २ वर्षांपर्यंतचा तुरुंगवास.

दुसऱ्यांदा उल्लंघन: ५ लाख रुपयांपेक्षा जास्त दंड किंवा दोन्ही शिक्षा.

अतिरिक्त कारवाई: जप्त केलेल्या मालाच्या किमतीच्या १० पट दंड आकारण्याचा अधिकार न्यायाधिशांना आहे.

ग्राहकांना ‘बीआयएस’चे महत्त्वाचे आवाहन:

"कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा बीआयएस-प्रमाणित उत्पादन खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांनी 'BIS Care App' किंवा अधिकृत बीआयएस पोर्टलवर जाऊन उत्पादनाचा नोंदणी क्रमांक नक्की तपासावा. बनावट चिन्हांचा संशय आल्यास तात्काळ बीआयएसकडे तक्रार नोंदवावी."

— भारतीय मानक ब्युरो (BIS)

Comments

No comments yet.