महाराष्ट्रातील पर्यटन विकासासाठी केंद्र सरकार काय करते आहे? मंत्री संसदेत म्हणाले...

Share:
Main Image
Last updated: 02-Aug-2026

नवी दिल्ली, (प्रतिनिधी) २ ऑगस्ट - महाराष्ट्रातील सांस्कृतिक, आध्यात्मिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक पर्यटन स्थळांचा कायापालट करण्यासाठी केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाकडून विविध योजनांतर्गत कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. 'स्वदेश दर्शन', 'प्रसाद', 'आव्हान-आधारित गंतव्य विकास' आणि 'भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य (SASCI)' या योजनांतर्गत राज्यातील पर्यटन पायाभूत सुविधांचा विकास केला जात आहे. केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी संसदेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

या योजनांचा मुख्य उद्देश स्थानिक संस्कृती, परंपरा आणि वारशाचे जतन करताना शाश्वत पर्यटनाला चालना देणे, पर्यटकांचा अनुभव समृद्ध करणे, स्थानिक रोजगारनिर्मिती करणे आणि अर्थव्यवस्थेला बळकट करणे हा आहे.

महाराष्ट्रात मंजूर झालेल्या प्रमुख पर्यटन प्रकल्पांचा तपशील:

१. भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य (SASCI / 2024-25):

राम-काल पथ विकास (नाशिक): नाशिक येथील ऐतिहासिक व धार्मिक महत्त्वाच्या 'राम-काल पथा'च्या विकासासाठी तब्बल ९९.१४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, त्यापैकी ६५.४३ कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत.

आयएनएस-गुलदार अंडरवॉटर म्युझियम व पाणबुडी पर्यटन (सिंधुदुर्ग): सिंधुदुर्ग येथे 'अंडरवॉटर म्युझियम', कृत्रिम प्रवाळ भित्तिका (Artificial Reef) आणि पाणबुडी पर्यटनासाठी ४६.९१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, ३०.९६ कोटी रुपये वितरित झाले आहेत.

२. स्वदेश दर्शन २.० योजना (2024-25):

शिवसृष्टी थीम पार्क (पुणे): छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित 'शिवसृष्टी थीम पार्क'च्या विकासासाठी ७५.४७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, त्यापैकी ३७.७४ कोटी रुपये अधिकृत करण्यात आले आहेत.

Advertisement

३. तीर्थक्षेत्र पुनरुज्जीवन व आध्यात्मिक वारसा वृद्धी अभियान ('प्रसाद' योजना):

त्र्यंबकेश्वर विकास (नाशिक - 2017-18): देश-विदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या त्र्यंबकेश्वरच्या सर्वसमावेशक विकासासाठी ४५.४१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, त्यापैकी ३८.४४ कोटी निधी अधिकृत झाला आहे.

४. आव्हान-आधारित गंतव्य विकास (CBDD / 2024-25):

अहमदनगर किल्ला विकास: ऐतिहासिक अहमदनगर किल्ल्याच्या संवर्धन आणि पर्यटन विकासासाठी २५.०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

५. स्वदेश दर्शन योजना (टप्पा १):

सिंधुदुर्ग किनारी परिपथ विकास (2015-16): सागरेश्वर, तारकर्ली, विजयदुर्ग समुद्रकिनारा व मिठबाव विकासासाठी १९.०६ कोटी रुपये (अधिकृत: १७.६१ कोटी).

धार्मिक-सांस्कृतिक परिपथ (2018-19): वाकी, अदासा, धापेवाडा, पारडसिंगा, तेलनखेडी आणि गिरड विकासासाठी ४५.४७ कोटी रुपये (अधिकृत: ४३.१९ कोटी).

राज्य सरकारमार्फत अंमलबजावणी व देखरेख

केंद्राने स्पष्ट केले आहे की, हे प्रकल्प राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनामार्फत राबवले जातात. केंद्रीय पर्यटन मंत्रालय नियमित आढावा बैठकी आणि प्रत्यक्ष भेटींद्वारे या प्रकल्पांच्या गुणवत्तेवर आणि प्रगतीवर २४ तास देखरेख ठेवते.

Comments

No comments yet.