राज्यातील ३,१९५ ॲम्ब्युलन्सच्या इंधनाचा प्रश्न मिटला... केव्हाही, कुठेही भरता येणार

Share:
Main Image
Last updated: 01-Aug-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १ ऑगस्ट - राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक तंत्रस्नेही, पारदर्शक आणि सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध असून, 'कॅशलेस पेट्रोकार्ड' उपक्रम हा या दिशेने पडलेला एक अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या उपक्रमामुळे १०२ रुग्णवाहिका सेवांचे व्यवस्थापन अधिक पारदर्शक आणि वेगवान होईल, असा विश्वास सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला.

मुंबईतील आरोग्य सेवा आयुक्तालयात आयोजित विशेष कार्यक्रमात या उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर, अतिरिक्त आयुक्त जगन्नाथ विरकर, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे (HPCL) प्रतिनिधी उपस्थित होते.

वेळेत इंधन पुरवठा अन् पारदर्शकता

शासकीय वाहनांना वेळेत इंधन उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आरोग्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. एचपीसीएल (HPCL) कंपनीच्या सहकार्याने राज्यातील ३,१९५ रुग्णवाहिकांना ही कॅशलेस पेट्रोकार्ड सुविधा दिली जाणार आहे. यामुळे इंधन खरेदीतील आर्थिक व्यवहार पारदर्शक होतील आणि कामातील विलंबाला आळा बसेल.

Advertisement

'१०२' रुग्णवाहिका आता सर्व रुग्णांसाठी उपलब्ध

यापूर्वी १०२ रुग्णवाहिकांची सेवा ही मुख्यत्वे माता व बालकांसाठी वापरली जात होती. मात्र, यापुढे ही सेवा राज्यातील सर्व रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात येत असल्याची मोठी घोषणा आरोग्यमंत्र्यांनी केली. ही यंत्रणा अधिक सक्षम करून १०८ रुग्णवाहिका सेवेला एक मजबूत पर्यायी व्यवस्था तयार करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

यावेळी आरोग्यमंत्री आबिटकर म्हणाले की, आरोग्य सेवा ही सर्वसामान्य नागरिकांसाठी जीवनदायी व्यवस्था आहे. या सेवांमध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून, विश्वासार्ह आणि पारदर्शक व्यवस्था उभारणे गरजेचे आहे. पेट्रोकार्डसारख्या अभिनव उपक्रमामुळे रुग्णवाहिकांच्या इंधन खरेदी व्यवस्थापनासह आर्थिक पारदर्शकता येईल व कामकाजातील अनावश्यक विलंब कमी होईल. आर्थिक व्यवहार अधिक पारदर्शक होतील आणि संपूर्ण यंत्रणा अधिक उत्तरदायी बनेल.

?s=20

Comments

No comments yet.