मुंबई, (प्रतिनिधी) १ ऑगस्ट - देशातील ऐतिहासिक तंतुवाद्य निर्मिती परंपरेसाठी प्रसिद्ध असलेल्या मिरज शहराच्या संगीत वारशाचे जतन, संवर्धन आणि जागतिक स्तरावर ब्रँडिंग करण्यासाठी महत्त्वाची पावले उचलली जात आहेत. मिरज येथे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक ‘मिरज म्युझिक हेरिटेज पार्क’ (Miraj Music Heritage Park) प्रस्तावाला गती देण्याचे निर्देश राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले आहेत. या प्रकल्पाचा प्राथमिक आराखडा तयार करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी व संबंधित विभागांची तातडीने संयुक्त बैठक घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
मंत्रालयात आयोजित या उच्चस्तरीय बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, संचालक श्रीराम पांडे, उद्योग संचालनालयाचे अतिरिक्त आयुक्त बी. टी. यशवंते तसेच मिरज येथील पारंपरिक तंतुवाद्य निर्माते व कारागीर उपस्थित होते.
प्रकल्पात काय असणार विशेष?
मिरज ही वैद्यकीय नगरीबरोबरच देशातील महत्त्वाची संगीतनगरी असून येथे सुमारे २०० हून अधिक कुटुंबे पारंपरिक पद्धतीने सितार, तानपुरा, सुरबहार, दिलरुबा, मयुरी वीणा आदी तंतुवाद्यांची निर्मिती करतात. या दोनशे वर्षांहून अधिक जुन्या परंपरेला बळकटी देण्यासाठी प्रस्तावित पार्कमध्ये खालील सुविधा असतील:
आधुनिक तंतुवाद्य निर्मिती केंद्र व विशेष वाद्य संग्रहालय (Museum)
प्रदर्शन दालन आणि परफॉर्मिंग आर्ट्स सेंटर
संगीत इतिहासाचे दस्तावेजीकरण व संशोधन सुविधा
नवोदित कलाकारांसाठी प्रशिक्षण केंद्र व नियमित सांस्कृतिक कार्यक्रम
जागतिक स्तरावर मिळणार नवी ओळख
बैठकीत बोलताना मंत्री ॲड. शेलार म्हणाले, "हा प्रकल्प मिरजच्या समृद्ध संगीत परंपरेला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देईल. सांस्कृतिक कार्य विभागाकडून या प्रकल्पासाठी संग्रहालयाची संकल्पना, वाद्य वारसा संवर्धन आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन पुरवले जाईल, तर जमीन व पायाभूत सुविधांचे नियोजन जिल्हा प्रशासनामार्फत केले जाईल." सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून मिरजच्या संगीत परंपरेला प्रतिष्ठा मिळवून द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.