मुंबई, (प्रतिनिधी) १ ऑगस्ट - रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या दिवेआगर येथे पर्यटकांसाठी अत्याधुनिक व सुसज्ज ॲक्वेरियम (Aquarium) उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प आराखडा (DPR) तातडीने तयार करून मंजुरीसाठी शासनाकडे सादर करावा, असे स्पष्ट निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत.
मंत्रालयात आयोजित उच्चस्तरीय बैठकीत दिवेआगर परिसरातील पर्यटन विकासाच्या विविध कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
स्थानिक पर्यटन आणि रोजगाराला मिळणार चालना
दिवेआगरचा निसर्गरम्य सागरी किनारा हा राज्यातील प्रमुख पर्यटन केंद्रांपैकी एक असून येथे वर्षभर पर्यटकांची मोठी गर्दी असते. पर्यटकांना अधिक दर्जेदार, शैक्षणिक आणि नाविन्यपूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या ॲक्वेरियमची उभारणी केली जात आहे.
बैठकीत मार्गदर्शन करताना मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, "प्रकल्पाचे नियोजन करताना केवळ पर्यटकांच्या गरजाच नव्हे, तर स्थानिक पर्यटनाला मिळणारी चालना आणि परिसराचा सर्वांगीण विकास यांचा प्रामुख्याने विचार केला जावा." तसेच, या संदर्भातील सर्व प्रशासकीय कार्यवाही ठरवून दिलेल्या वेळेत पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
बैठकीत तांत्रिक व आर्थिक बाबींवर चर्चा
मंत्रालयातील बैठकीस रायगडचे जिल्हा नियोजन अधिकारी, पर्यटन संचालनालयाचे संचालक, कार्यकारी अभियंता आणि पर्यटन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या वेळी ॲक्वेरियम प्रकल्पाच्या तांत्रिक, प्रशासकीय आणि आर्थिक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.