पालकमंत्र्यांची बैठक संपवून घरी गेला... थेट ४५ लाखाची लाच घेताना सापडला... कोण आहे हा नमुना?

Share:
Main Image
Last updated: 01-Aug-2026

बीड, (प्रतिनिधी) १ ऑगस्ट - पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू असतानाच, बीडच्या प्रशासकीय वर्तुळात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड यांना तब्बल ४५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना छत्रपती संभाजीनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले.

विशेष म्हणजे, आरोपी अधिकारी लखमावाड हे २०१६ च्या एमपीएससी (MPSC) वनसेवा परीक्षेत अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातून राज्यात प्रथम आले होते. या कारवाईमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

नांदेडचे 'टॉपर' अधिकारी अडकले लाचेच्या जाळ्यात

मूळचे नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील रत्नाळी गावचे रहिवासी असलेले श्रीनिवास लखमावाड हे बी.टेक. इंजिनिअर आहेत. २०१६ मध्ये MPSC परीक्षेत राज्यात अव्वल आल्यानंतर "कष्ट करण्याची तयारी असली की यश मिळते" असा संदेश देणारे लखमावाड आज स्वतःच ४५ लाखांच्या लाचखोरी प्रकरणात जाळ्यात अडकले.

बिले मंजूर करण्यासाठी तब्बल ४५ लाखांची मागणी

सन २०२५-२६ मधील वृक्षलागवडीची थकीत बिले मंजूर करणे, कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन अदा करणे आणि निलंबनाची कारवाई मागे घेण्यासाठी लखमावाड यांनी तक्रारदाराकडे ४५ लाखांच्या लाचेची मागणी केली होती.

Advertisement

याप्रकरणी तक्रारदाराने २९ जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर एसीबीकडे तक्रार नोंदवली. एसीबीच्या पथकाने पडताळणी केल्यानंतर बीडमध्ये सापळा रचला.

पालकमंत्र्यांची बैठक संपली अन् एसीबीचा 'सापळा' यशस्वी!

गुरुवारी बीडमध्ये उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची (DPC) बैठक पार पडली. या बैठकीला लखमावाड यांनी हजेरी लावली होती. बैठक आणि कार्यालयाचे कामकाज आटोपून ते सायंकाळी आपल्या निवासस्थानी पोहोचले.

त्याच वेळी एसीबीच्या पथकाने घरातच छापा टाकला. तक्रारदाराकडून ५ लाख रुपयांच्या खऱ्या नोटा आणि ४० लाख रुपयांच्या 'मनोरंजन बँकेच्या' (डमी) नोटा स्वीकारताना लखमावाड यांना रंगेहात पकडण्यात आले.

स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; एसपी माधुरी कांगणे बीडमध्ये!

या धडक कारवाईनंतर एसीबीच्या अधीक्षक माधुरी कांगणे स्वतः बीडमध्ये दाखल झाल्या असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. बीडमधील स्थानिक पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एका मोठ्या आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यावर एवढी मोठी कारवाई झाल्याने लाचखोर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Comments

No comments yet.