जळगाव जिल्ह्यात पावसाचे धुमशान... भडगावमध्ये ५ बालकांसह ८ जणांचे थरारक बचावकार्य!

Share:
Main Image
Last updated: 31-Jul-2026

जळगाव, (प्रतिनिधी) ३१ जुलै - जिल्ह्यात मुसळधार पावसाने जोरदार धुमशान घातले असून, सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाच्या तडाख्यामुळे नद्या, नाले उफाळून आले असून विविध धरणांमधील जलसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हा प्रशासन पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आले असून, पूरपरिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.

गांधी मार्केटच्या बेसमेंटमध्ये पाणी; पालिकेची धावपळ

जळगाव शहरातील प्रसिद्ध गांधी मार्केट येथील बेसमेंटमधील सर्व दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांची मोठी फजिती झाली. काही व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली, तर काही दुकानदार आवश्यक ती खबरदारी घेऊन व्यवसाय सांभाळताना दिसले. यंत्रणांकडून पाणी उपसण्याचे काम सुरू आहे. दुसरीकडे भुसावळ आणि बोदवड नगरपालिकेची यंत्रणा साचलेले पाणी, कचरा आणि नाल्यांतील अडथळे दूर करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडून अंजनी धरणाची पाहणी

जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः एरंडोल तालुक्यातील अंजनी धरणास भेट देऊन पाणीपातळी, जलसाठा व तांत्रिक बाबींची प्रत्यक्ष पाहणी केली. सुरक्षेचा आढावा घेत सर्व संबंधित यंत्रणांनी आपापसांत समन्वय ठेवून पूर्ण सज्ज राहावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत.

मौजे बात्सर येथे आपत्ती व्यवस्थापनाचे मोठे यश

भडगाव तालुक्यातील मौजे बात्सर येथे अचानक पाणी वाढल्याने एका घरात ५ लहान बालके आणि ३ महिला अडकून पडल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत यशस्वी बचाव कार्य राबवले. पाचोरा मतदारसंघाचे आमदार आणि भडगावच्या तहसीलदारांच्या उपस्थितीत या सर्व ८ जणांना सुखरूप बाहेर काढून त्यांच्या तात्पुरत्या निवास व भोजनाची सोय करण्यात आली आहे.

Advertisement

?s=20

धबधबे प्रवाहित; पर्यटकांना सतर्कतेचा इशारा

यावल तालुक्यातील वड्री धरण, निंबा देवी धरण आणि प्रसिद्ध मनू देवी धबधबा परिसरात सतत सुरू असलेल्या धुवांधार पावसामुळे जलसाठ्यात प्रचंड वाढ झाली आहे. मनू देवी धबधबा पूर्ण क्षमतेने वाहू लागल्याने नागरिक व पर्यटकांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. धरण परिसर, नदी-नाले, पूल आणि पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांवर अनावश्यक वावर टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

?s=20

अंजनी धरणातून ५,५०० क्युसेक्स विसर्ग; पालकमंत्र्यांचे आवाहन

पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक प्रचंड वाढल्याने पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार अंजनी मध्यम प्रकल्पातून सुमारे ५५०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. पावसाच्या तीव्रतेनुसार विसर्ग कमी-जास्त केला जाईल, अशी माहिती गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पाटील यांनी दिली.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा इशारा:

"नदीकाठच्या गावांतील नागरिक, शेतकरी व ग्रामस्थांनी अत्यंत सतर्क राहावे. कोणत्याही परिस्थितीत नदीपात्रात उतरू नये अथवा पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये. आपले पशुधन, शेतीचे पंप व मौल्यवान साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे."

Comments

No comments yet.