एअरटेल, Vi ला मागे टाकत जिओची आघाडी... एकाच महिन्यात मिळवले इतके लाख ग्राहक...

Share:
Main Image
Last updated: 31-Jul-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ३१ जुलै - भारतीय दूरसंचार क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या रिलायन्स जिओने जून महिन्यात पुन्हा एकदा आपली आघाडी कायम ठेवली आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) ताज्या आकडेवारीनुसार, जिओने जून महिन्यात सर्वाधिक म्हणजेच ३३.३ लाख सक्रिय (VLR) मोबाईल ग्राहक आपल्या ताफ्यात जोडले आहेत. या वाढीसह जिओच्या सक्रिय ग्राहकांची एकूण संख्या ४९.८९ कोटींवर पोहोचली आहे.

बाजारातील ४१.५ टक्के हिश्श्यासह जिओ अग्रस्थानावर

ट्रायच्या अहवालानुसार, देशातील एकूण १२०.११ कोटी सक्रिय मोबाईल ग्राहकांपैकी एकट्या जिओचा बाजारातील हिस्सा ४१.५ टक्के झाला आहे. जून महिन्यात जिओने एकूण २१.५ लाख नवीन मोबाईल जोडण्या मिळवत एकूण ग्राहकसंख्या ५०.३६ कोटींवर नेली आहे. ३९.३ टक्के एकूण बाजारहिस्स्यासह जिओ देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी म्हणून अग्रस्थानी कायम आहे.

दुसऱ्या बाजूला, भारती एअरटेलने २९.३ लाख सक्रिय ग्राहक जोडले, तर व्होडाफोन आयडिया (Vi), बीएसएनएल (BSNL) आणि एमटीएनएल (MTNL) च्या सक्रिय ग्राहकसंख्येत मात्र घट नोंदवण्यात आली आहे.

Advertisement

वायरलाइन आणि ५G FWA मध्येही वर्चस्व

केवळ मोबाईल सेवेतच नव्हे, तर फिक्स्ड लाईन (वायरलाइन) सेवेतही जिओने आपले वर्चस्व कायम राखले आहे. जून महिन्यात १.४४ लाख नवीन कनेक्शनसह जिओची एकूण वायरलाइन ग्राहकसंख्या १.५६ कोटी झाली असून, या क्षेत्रातील बाजारातील हिस्सा ३२.७ टक्क्यांवर पोहोचला आहे.

याशिवाय, ५G फिक्स्ड वायरलेस ॲक्सेस (FWA) सेवेमध्ये जिओची ग्राहकसंख्या ९१.१४ लाखांवर पोहोचली आहे. देशातील एकूण ५G FWA ग्राहकांपैकी तब्बल ७०.५ टक्के ग्राहक एकट्या जिओकडे आहेत. तसेच, UBR-आधारित फिक्स्ड वायरलेस सेवा पुरवणारी जिओ ही देशातील एकमेव कंपनी ठरली असून, या सेवेचे एकूण ४९.३४ लाख ग्राहक झाले आहेत.

ट्रायच्या आकडेवारीनुसार, जून अखेरपर्यंत देशातील एकूण दूरध्वनी (टेलिफोन) ग्राहकसंख्या वाढून १३४.८ कोटींवर पोहोचली आहे.

Comments

No comments yet.