जळगाव जिल्ह्यात मुसळधार... या तीन धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग...

Share:
Main Image
Last updated: 31-Jul-2026

जळगाव, (प्रतिनिधी) ३१ जुलै - शहरासह संपूर्ण जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहत असून जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील जलसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता हतनूर, गिरणा आणि अंजनी धरणांतून पाण्याचा मोठा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, नदीकाठच्या नागरिकांनी पूर्ण दक्षता बाळगावी, पूरस्थिती पाहण्यासाठी गर्दी करू नये आणि अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे कळकळीचे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.  

हतनूरचे ३६ दरवाजे उघडले; विसर्ग वाढणार

हातनूर धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने पाण्याची आवक प्रचंड वाढली आहे. धरणाचे ४१ पैकी ४ दरवाजे पूर्ण, तर ३२ दरवाजे दोन मीटरने उघडण्यात आले आहेत. सध्या तापी नदीपात्रात १ लाख ८५ हजार ८२८ क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे. पाणलोट क्षेत्रातील आवक पाहता पुढील काही तासांत हा विसर्ग ३ लाख ५० हजार ते ३ लाख ७५ हजार क्युसेक्सपर्यंत वाढवला जाण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आज स्वतः हतनूर धरण परिसरात पोहोचून परिस्थितीची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले.  

गिरणा अन् अंजनीतूनही पाणी सोडले

अंजनी मध्यम प्रकल्प: धरणातील वाढती जलपातळी लक्षात घेऊन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार अंजनी धरणातून सुमारे ५,५०० क्युसेक्स पाण्याचा नियंत्रित विसर्ग सुरू करण्यात आला आहे.  

गिरणा प्रकल्प: चाळीसगाव उपविभागांतर्गत असलेला गिरणा मोठा प्रकल्प दुपारी १२ वाजेपर्यंत ९७.०६ टक्के भरला आहे. धरणात १० ते १५ हजार क्युसेक्सने आवक सुरू असल्याने दुपारी १ वाजता धरणाचे दरवाजे उघडून १,००० ते २,००० क्युसेक्स पाणी गिरणा नदीत सोडण्यात आले. आवक वाढल्यास हा विसर्ग आणखी वाढवला जाईल, अशी माहिती उपविभागीय अभियंता विजय जाधव व गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पाटील यांनी दिली.  

नागरिकांना अन् प्रशासनाला सूचना

Advertisement

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पोलीस, महसूल, आपत्ती व्यवस्थापन, नगरपालिका, आरोग्य व महावितरण या सर्व यंत्रणांना २४ तास सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.  

नागरिकांसाठी महत्त्वाची आवाहने:

पूल व नाले ओलांडू नका: पाण्याखाली गेलेले लहान पूल, ओढे किंवा वेगाने वाहणारे रस्ते ओलांडण्याचा प्रयत्न करू नका.  

पशुधन व शेती साहित्य सुरक्षित हलवा: नदीकाठावरील शेतकरी व ग्रामस्थांनी आपले गुरेढोरे, शेतीतील मोटारपंप, कृषी अवजारे आणि मौल्यवान साहित्य तातडीने सुरक्षित स्थळी हलवावे.  

बांधकामे व यंत्रसामग्री हलवा: नदीपात्रात विविध विभागांची सुरू असलेली कामे, यंत्रसामग्री व साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  

आपत्कालीन संपर्क: कोणतीही अडचण किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी तात्काळ स्थानिक ग्रामपंचायत, तहसील कार्यालय किंवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा.

?s=20

Comments

No comments yet.