मुंबई, (प्रतिनिधी) ३१ जुलै - अवास्तव परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून फरार झालेल्या राहुल शामराव काळोखे या भामट्याला भारतात परत आणण्यात यश आले आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) परराष्ट्र मंत्रालय, गृह मंत्रालय आणि महाराष्ट्र पोलिसांच्या समन्वयाने ३० जुलै २०२६ रोजी त्याला फिजी देशातून भारतात आणले.
काय आहे प्रकरण?
राहुल काळोखे याने आपल्या साथीदारांच्या संगनमताने लोकांना विविध गुंतवणूक योजनांमध्ये अवास्तव आणि निश्चित परताव्याची खोटी आश्वासने दिली होती. त्याच्या या भुलथापांना बळी पडत अनेक गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर रक्कम गुंतवली. मात्र, पैसे गोळा झाल्यानंतर आरोपीने या रकमेचा स्वत:च्या वैयक्तिक फायद्यासाठी वापर केला आणि गुंतवणूकदारांची फसवणूक केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास व न्यायालयीन कारवाईपासून वाचण्यासाठी तो परदेशात पसार झाला होता.
'रेड नोटीस' आणि फिजीत अटक
महाराष्ट्र पोलिसांच्या विनंतीवरून सीबीआयने इंटरपोलच्या (Interpol) माध्यमातून आरोपी काळोखेविरुद्ध 'रेड नोटीस' जारी केली होती. इंटरपोलच्या जाळ्याचा वापर करून त्याचा शोध घेतला असता तो फिजीमध्ये दडून बसल्याचे निष्पन्न झाले. या माहितीच्या आधारे फिजीच्या अधिकाऱ्यांनी त्याला तात्काळ अटक केली.
त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांचे एक विशेष पथक फिजीला गेले होते. हे पथक ३० जुलै २०२६ रोजी आरोपीला ताब्यात घेऊन यशस्वीरीत्या भारतात परतले आहे.
१७० हून अधिक फरार गुन्हेगार भारतात!
भारतात इंटरपोलचे राष्ट्रीय केंद्रीय ब्युरो (National Central Bureau) म्हणून सीबीआय काम करते. सीबीआय 'भारतपोल'च्या माध्यमातून देशातील सर्व कायदा अंमलबजावणी संस्थांशी समन्वय साधते. परराष्ट्र मंत्रालय, गृह मंत्रालय आणि राज्य पोलिसांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे अलिकडच्या वर्षांत इंटरपोलच्या मदतीने तब्बल १७० हून अधिक पसार गुन्हेगारांना परदेशांतून भारतात आणण्यात यश आले आहे.