नवी दिल्ली, (प्रतिनिधी) ३० जुलै - देशात माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राच्या विस्तारासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवत असून, महाराष्ट्रातील कोल्हापूर केंद्राने यामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ दरम्यान कोल्हापूर येथील 'सॉफ्टवेअर तंत्रज्ञान पार्क' (STPI) केंद्रातील नोंदणीकृत ७ युनिट्सने तब्बल २४१.४९ कोटी रुपयांची आयटी निर्यात केली आहे, अशी माहिती केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितिन प्रसाद यांनी आज लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली.
सध्या कोल्हापूर शहरात सुमारे ३७२ आयटी व आयटीईएस (IT/ITES) युनिट्स कार्यरत असून त्याद्वारे सुमारे ९ हजार लोकांना रोजगार मिळाला आहे.
अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि पाठबळ
केंद्र सरकारच्या 'एसटीपीआय' योजनेंतर्गत देशात ७३ केंद्र स्थापन करण्यात आली असून, महाराष्ट्रात पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजी नगर अशा ६ शहरांमध्ये ही केंद्रे कार्यरत आहेत. कोल्हापूर येथील एसटीपीआय केंद्र सुमारे ६,६०० चौरस फूट क्षेत्रात विस्तारलेले असून तेथे:
६२ पूर्णतः सज्ज (प्लग अँड प्ले) इन्क्युबेशन सीट्स
कॉन्फरन्स आणि मिटिंग रूम्स
नेटवर्क ऑपरेशन्स सेंटर (NOC)
हाय-स्पीड डेटा कम्युनिकेशन, क्लाउड सर्व्हिसेस व वैधानिक सहाय्य
याशिवाय नवउद्योजकांना (Start-ups) आयआयटी (IIT), एनआयटी (NIT), उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ व व्हेंचर कॅपिटलिस्ट्ससोबत संवाद साधण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते.
राज्य सरकारच्या धोरणाचा फायदा
आयटी क्षेत्राला बळ देण्यासाठी महाराष्ट्र शासनदेखील 'राज्य आयटी धोरणा'अंतर्गत कर परतावा (Tax Rebates) आणि विजेच्या दरात सवलतींसारखी आर्थिक व बिगर-आर्थिक प्रोत्साहने देत आहे. तसेच, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (MIDC) २००३ मध्ये कोल्हापुरात १.६० हेक्टर क्षेत्रावर आयटी पार्क विकसित केले असून तेथील तीनही भूखंडांवर आयटी उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू आहेत.
केंद्राच्या योजना आणि राज्य शासनाच्या सवलतींमुळे कोल्हापूर व आसपासच्या परिसरात आयटी परिसंस्थेला (IT Ecosystem) मोठी गती मिळत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.