मुंबई, (प्रतिनिधी) ३० जुलै - भाजपचे संकटमोचक मानले जाणारे मंत्री गिरीश महाजन आणि खडसे कुटुंबातील जुना संघर्ष पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हे आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका कथित ऑडिओ क्लिपमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असून, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर निशाणा साधण्यात आल्याचे ऐकायला मिळत आहे.
दरम्यान या ऑडिओ क्लिपच्या सत्यतेबाबत कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
कथित ऑडिओ क्लिपमध्ये नेमके काय?
व्हायरल झालेल्या संभाषणात भाजप नेते विजय चौधरी आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात चर्चा सुरू असल्याचे समजते.
संभाषणादरम्यान विजय चौधरी म्हणतात,
"एकनाथ खडसे आणि त्यांची मुलगी नेहमीच भाजपवर टीका करतात, मग आपण रक्षा खडसेंना मंत्री का बनवून ठेवले आहे? त्यांना पदावरून काढले पाहिजे. उठले-सुटले घाणेरडे आरोप केले जातात... एकाच घरात राहून एकमेकांना मदत करायची आणि पक्षावरच टीका करायची, ही दुहेरी भूमिका कशी सहन करायची? रक्षा खडसे यांनी राजीनामा द्यायला हवा."
या संभाषणावर मंत्री गिरीश महाजन हे "हम्म... बरोबर आहे" असे म्हणत सहमती दर्शवत असल्याचे कथित क्लिपमध्ये ऐकू येत आहे.
आमदार रोहित पवारांचा भाजपवर घणाघाती हल्ला
या कथित ऑडिओ क्लिपवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. सोशल मीडियाद्वारे प्रतिक्रिया देताना ते म्हणाले:
'आयत्या पिठावर रेघोट्या ओढणारे नेते': आज जी भाजप सत्तेत आहे, ती स्व. प्रमोद महाजन, स्व. गोपीनाथ मुंडे, स्व. पांडुरंग फुंडकर आणि एकनाथ खडसे यांच्या कठोर मेहनतीमुळे उभी राहिली आहे. आजचे नेते हे केवळ आयत्या पिठावर रेघोट्या ओढणारे आहेत.
महिला नेत्याचा अनादर: भाजपचे नेते आणि त्यांचे बगलबच्चे स्वतःच्याच पक्षाच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे आणि रोहिणीताई खडसे यांच्याबाबत अर्वाच्य भाषा वापरतात. त्यातील शिवीगाळ इतकी गंभीर आहे की ती क्लिप सार्वजनिकही करता येत नाही.
'पार्टी विथ डिफरन्स'ची पोलखोल: स्वपक्षाच्या महिला नेत्याबाबत अशी गलिच्छ भाषा वापरणाऱ्या भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे. हीच का 'पार्टी विथ डिफरन्स'? या ऑडिओ क्लिपची सखोल शहानिशा झाली पाहिजे, अशी मागणीही रोहित पवार यांनी केली.