नवी दिल्ली, (प्रतिनिधी) ३० जुलै - देशभरातील रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास आणि आधुनिकीकरण करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे 'अमृत भारत स्थानक योजना' राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील १३२ रेल्वे स्थानकांची निवड करण्यात आली असून, त्यापैकी २० स्थानकांनावरील विकासकामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित स्थानकांवर कामे वेगाने सुरू असून प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि आरामदायक करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत दिली.
महाराष्ट्रातील 'या' २० स्थानकांचे काम पूर्ण!
राज्यातील ज्या २० रेल्वे स्थानकांवर आधुनिकीकरणाची कामे पूर्ण झाली आहेत, त्यामध्ये आमगाव, बारामती, भायखळा, चांदा फोर्ट, चिंचपोकळी, देवळाली, धुळे, हिमायतनगर, केडगाव, लासलगाव, लोणंद जंक्शन, मलकापूर, माटुंगा, मूर्तिजापूर जंक्शन, नांदुरा, नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी जंक्शन, परळ, सावदा, शहाड आणि वडाळा रोड या स्थानकांचा समावेश आहे.
जळगाव जिल्ह्यातील ५ स्थानकांचा समावेश
जळगाव लोकसभा मतदारसंघातील अमळनेर, चाळीसगाव, धरणगाव, पाचोरा जंक्शन आणि जळगाव या स्थानकांचा यात समावेश आहे. पाचोरा येथे बहुतांश कामे पूर्ण झाली असून लिफ्ट बसवण्याचे काम सुरू आहे, तर चाळीसगाव, धरणगाव आणि अमळनेर येथे नवीन इमारती, पादचारी पूल, लिफ्ट आणि सरकत्या जिन्यांचे (Escalators) काम प्रगतीपथावर आहे. जळगाव स्थानकाचा 'मास्टर प्लॅन' सध्या तयार केला जात आहे.
स्थानकांवर मिळणाऱ्या अत्याधुनिक सुविधा:
आधुनिक इमारती व परिसर: नवीन स्थानक इमारती, रुंद पादचारी पूल, भुयारी मार्ग, लिफ्ट आणि सरकते जिने.
प्रवासी सुविधा: प्रशस्त प्रतीक्षा कक्ष, डिजिटल माहिती प्रणाली, सुविधायुक्त विश्रांती कक्ष, स्वच्छ शौचालये आणि पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय.
स्थानिक रोजगाराला चालना: 'वन स्टेशन वन प्रॉडक्ट' उपक्रमांतर्गत स्थानिक उत्पादनांच्या विक्रीसाठी विशेष स्टॉल्स.
'दिव्यांगजन'स्नेही सुविधा: 'सुगम्य भारत अभियाना'अंतर्गत रॅम्प, कमी उंचीची तिकीट काउंटर्स, ब्रेल लिपीतील दिशादर्शक आणि स्पर्श मार्गांची (Tactile paths) निर्मिती.
३,५४३ कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद
महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी २०२६-२७ या आर्थिक वर्षात ३,५४३ कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. यापैकी जून २०२६ पर्यंत १,६७१ कोटी रुपये आधीच खर्च झाले आहेत. प्रवाशांची सुरक्षा, रेल्वे वाहतूक खंडित न होऊ देणे आणि तांत्रिक मंजुरी घेऊन ही कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जात असल्याचे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.