ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मोठा दिलासा... एसटीचे स्मार्ट कार्ड...

Share:
Main Image
Last updated: 30-Jul-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ३० जुलै - एसटी प्रवासात राज्य शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी 'एनसीएमसी स्मार्ट कार्ड' (NCMC Smart Card) अनिवार्य करण्याच्या निर्णयाला १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप हे स्मार्ट कार्ड न मिळाल्याने त्यांची प्रवासात गैरसोय होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

राज्य शासनाच्या वतीने 'अमृत ज्येष्ठ नागरिकांना' एसटी प्रवासात १००% मोफत प्रवास, तर अन्य ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना प्रवास भाड्यात ५०% सवलत दिली जाते. या सवलती अधिक सुलभ, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी १ ऑगस्टपासून एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात येणार होते. मात्र, अनेक पात्र प्रवाशांनी नोंदणी करूनही त्यांना प्रत्यक्ष कार्ड मिळणे बाकी असल्याने हा मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.

"कोणीही सवलतीपासून वंचित राहणार नाही"

"एसटीची प्रवासी सवलत ही सर्वसामान्यांच्या सोयीसाठी आहे. तांत्रिक किंवा प्रक्रियात्मक कारणांमुळे कोणत्याही पात्र ज्येष्ठ नागरिक अथवा महिला प्रवाशाची गैरसोय होऊ नये, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. त्यामुळे कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे."

Advertisement

— प्रताप सरनाईक (परिवहन मंत्री व अध्यक्ष, एमएसआरटीसी)

प्रवाशांना आवाहन:

या मुदतवाढीमुळे अद्याप स्मार्ट कार्ड न मिळालेल्या लाखो ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, ज्या पात्र प्रवाशांनी अजूनही एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी अर्ज केलेला नाही किंवा प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी या वाढीव वेळेचा उपयोग करून आपली नोंदणी व कार्ड प्राप्त करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

?s=20

Comments

No comments yet.