मतदार यादीत नावनोंदणी... या तारखेपर्यंतच संधी...

Share:
Main Image
Last updated: 29-Jul-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २९ जुलै - महाराष्ट्र राज्यात सध्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी वेगाने सुरू आहे. सध्याच्या मतदार यादीतील सर्व मतदारांनी ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत आपला गणना अर्ज भरून व स्वाक्षरी करून गृहभेटीस येणाऱ्या संबंधित 'बीएलओ' (BLO - मतदान केंद्रस्तरीय अधिकारी) यांच्याकडे जमा करावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे. वेळेत अर्ज सादर करणाऱ्या मतदारांची नावे १७ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीत समाविष्ट केली जातील.

महत्त्वाचे टप्पे आणि कालावधी:
८ ऑगस्ट २०२६: बीएलओंकडे स्वाक्षरी केलेला गणना अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख.
१७ ऑगस्ट २०२६: 'प्रारूप मतदार यादी' (Draft Electoral Roll) प्रसिद्ध होणार.
१७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०२६ (दावे व हरकतींचा काळ):
नवीन नोंदणी: नवमतदार व नाव नसलेल्या पात्र नागरिकांसाठी नमुना ६ (Form 6) भरणे.
दुरुस्ती: नाव, पत्ता किंवा इतर नोंदींमध्ये सुधारणेसाठी नमुना ८ (Form 8).
नाव वगळणे: मतदार यादीतील चुकीच्या नोंदीवर हरकत नोंदवून नाव वगळण्यासाठी नमुना ७ (Form 7).
१९ ऑक्टोबर २०२६: राज्याची 'अंतिम मतदार यादी' प्रसिद्ध होणार.

Advertisement

खोटी माहिती दिल्यास होणार कडक कारवाई!
मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी, दुरुस्ती करण्यासाठी किंवा नाव वगळण्यासाठी अर्ज करताना चुकीची घोषणा अथवा खोटी माहिती दिल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० च्या कलम ३१ नुसार संबंधितांवर गंभीर कारवाई केली जाईल. यामध्ये १ वर्षापर्यंतचा कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षांची तरतूद असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मतदार नोंदणी ही निरंतर प्रक्रिया
१९ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही पात्र नागरिकांना कलम २२ व २३ नुसार नमुना ६ द्वारे नाव नोंदणी किंवा दुरुस्ती करता येईल. मतदार यादी अद्ययावत करणे ही निरंतर प्रक्रिया असून, कोणत्याही निवडणुकीसाठी नामनिर्देशन (अर्ज) भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत नागरिकांना या सुधारणा करता येतील, असेही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

Comments

No comments yet.