महाराष्ट्रातील या रेल्वे मार्गासाठी १६३ कोटी मंजूर... या प्रमुख शहरांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग...

Share:
Main Image
Last updated: 28-Jul-2026

नवी दिल्ली, (प्रतिनिधी) २८ जुलै - भारतीय रेल्वेने दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील परभणी-मुदखेड दुहेरी रेल्वे मार्गाच्या आधुनिकीकरणासाठी तब्बल १६३ कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पामुळे या मार्गावरील प्रवासी आणि मालवाहतुकीची क्षमता तसेच गती लक्षणीयरीत्या वाढणार असून, भविष्यात 'वंदे भारत एक्स्प्रेस'सारख्या अतिजलद गाड्यांचे कार्यक्षम संचालन सुलभ होणार आहे.

२x२५ केव्ही अत्याधुनिक विद्युत प्रणाली बसवणार

या प्रकल्पांतर्गत सुमारे १६४ ट्रॅक किलोमीटर रेल्वे मार्गावर सध्या असलेली १x२५ केव्ही इलेक्ट्रिक ट्रॅक्शन प्रणाली बदलून अत्याधुनिक २x२५ केव्ही प्रणाली बसवण्यात येणार आहे. तसेच वाढीव वीजभार हाताळण्यासाठी वीज पुरवठा यंत्रणा, उपकेंद्रे आणि पायाभूत सुविधांचे नूतनीकरण केले जाईल. यामुळे गाड्यांना स्थिर व अखंड वीजपुरवठा मिळून तांत्रिक अडचणी दूर होण्यास मदत होईल.

Advertisement

प्रमुख शहरांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग

परभणी-मुदखेड हा मार्ग भारतीय रेल्वेच्या 'हायली युटिलाइज्ड नेटवर्क' (HUN Route-9) मधील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. हा मार्ग अजमेर, इंदूर, खंडवा, अकोला, पूर्णा, मुदखेड, सिकंदराबाद आणि मेहबूबनगर यांसारख्या प्रमुख शहरांना व औद्योगिक केंद्रांना जोडतो. त्यामुळे या क्षमतावाढीचा थेट फायदा प्रवासी, उद्योग आणि व्यापार क्षेत्राला होणार आहे.

२०२९-३० च्या मालवाहतूक उद्दिष्टाला बळ

उच्च वेगाच्या गाड्यांच्या सुरक्षित संचालनासोबतच मालवाहतुकीची वहनक्षमता वाढल्याने भारतीय रेल्वेचे २०२९-३० पर्यंत ३,००० दशलक्ष टन मालवाहतुकीचे उद्दिष्ट गाठणे शक्य होणार आहे. देशातील सर्वाधिक वर्दळीच्या मार्गांचे सक्षमीकरण करण्याच्या दिशेने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

Comments

No comments yet.